शरद पवारांचा पिंपरी चिंचवड मध्ये अजितदादा पवार यांना मोठा धक्का ; शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिला राजीनामा
- राम कृष्ण हरी…वाजवा तुतारी चा जयघोष भोसरीत दुमदुमणार
- ३९ पदाधिकाऱ्यानी दिले राजीनामे
- शरद पवारांच्या उपस्थित करणार समर्थक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा प्रवेश
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीला जोरदार धक्का देत ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळविला. आता त्यांनी विधासभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने राज्यातील विविध जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षातील पदाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश देण्यास सुरुवात केली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का देण्यास सुरुवात केली आहे.
अजितदादा पवार यांचे बलस्थान असणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये धक्के देण्यास सुरुवात झाली आहे. त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष व उद्योजक अजित गव्हाणे व त्यांच्याबरोबर असणारे नगरसेवक व समर्थकांनी आपल्या पदाचे राजीनामे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पत्राद्वारे पाठविला आहे. अजित गव्हाणे यांनी राजीनामा दिल्यामुळे शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मोठा धक्का दिला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघाबरोबर चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी ही भविष्यात शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे ही विश्वसनीय वृत्त आहे.
जवळपास एक महिन्यापासून शहराध्यक्ष अजित गव्हाणे व पिंपरी चिंचवड शहरातील अजितदादा गटातील वीस पेक्षा जास्त माजी नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त होते. त्याअनुषंगाने शरद पवार यांची भेट घेतली होती. अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. त्याअनुषंगाने त्यांनी मतदारसंघातील पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यावर सर्वांची मते जाणून घेऊन सर्वांच्या विचारांती शरद पवार गटात प्रवेश करण्याचे नक्की केले.
त्यादृष्टीने त्यांनी पाहिले पाऊल टाकले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. अजित गव्हाणे यांच्यासह शहर कार्याध्यक्ष माजी नगरसेवक राहुल भोसले, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष माजी नगरसेवक पंकज भालेकर यांच्यासह ३९ पदाधिकाऱ्यानी राजीनामे दिले आहेत.