महायुती बुचकळ्यात… ‘राष्ट्रवादी’ केंद्रस्थानी पुन्हा पवारसाहेबच..! छगन भुजबळांच्या नंतर खा.सुनेत्रा पवार यांनी घेतली शरद पवार यांची भेट..?
- राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या चर्चा
लोकमान्य टाइम्स : पुणे
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात काही तरी भूकंप होणार असे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. त्याच्या केंद्रस्थानी पुन्हा राजकारणातील वस्ताद अशी ओळख असलेले शरद पवार यांच्याच भोवती राजकारण फिरत असल्याचे दिसत आहे. रविवारी ( दि.१४ ) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीत जावून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आरक्षण संदर्भात टीका केली. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसी सोमवारी (दि.१५) सिल्व्हर ओक वर जावून शरद पवार यांची भेट घेतली.
या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली. या घटनेला चोवीस तास उलटत नाहीत तोपर्यंत राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा अजितदादा पवार यांनी मंगळवारी (दि.१६) पुणे येथील मोदी बागेत शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे. सुनेत्रा पवार नेमक्या शरद पवार यांना की मोदी बागेतील इतर नातेवाईक यांना भेटल्या हे जोपर्यंत अधिकृतपणे कळत नाही तोपर्यंत याला राजकीय वास हा येणारच. अचानक अजित पवार गटाचे नेते मंडळी शरद पवार यांना भेटत असल्याने महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्ष बुचकळ्यात पडल्याची चर्चा आहे.
मंगळवारी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा अजितदादा पवार या मोदी बागेत दिसल्या. त्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटायला गेले असल्याचा कायास बांधला जात आहे. सुनेत्रा पवार या जवळपास दीड तास मोदी बागेत होत्या. त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्याठिकाणी खा. सुप्रिया सुळे ही उपस्थित होत्या अशी चर्चा रंगली आहे. राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर प्रथमच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. ही जरी घरगुती भेट असली तरी सद्या राज्यातील राजकारणात अनेक घटना घडत असल्याने तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तिसरी आघाडी च्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याची ही चर्चा सुरू असून त्याअनुषंगाने ही भेट सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून होत आहे का ? याबाबत ही काही जण या भेटीबाबत खासगीत प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
त्यात रविवारी (दि.१४ ) बारामती येथे अजितदादा पवार गटाने जन सन्मान रॅलीच्या निमित्त जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यामध्ये अजितदादा यांनी भविष्यातील वाटचाली बाबत माहिती दिली. तसेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने खोटा प्रचार केल्यामुळे राज्यात महायुतीला फटका बसल्याचे ठासून सांगितले. तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीचे सरकार काय उपाय योजना करणार आहे याची माहीत देत महाविकास आघाडीच्या विरोधात तोफ डागली.
दरम्यान बारामतीमध्ये रविवारी राज्याचे जेष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणावरून जे राजकारण सुरू आहे त्याबाबत भाष्य केले. आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारमधील सत्ताधारी पक्षासह विरोधी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते ; परंतु संबंधित विरोधी पक्षातील नेते या बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. त्यावरून आरक्षण मुद्द्यावर त्यांचे काय मत आहे हे सिध्द झाले असून त्यांना बैठकीच्या दिवशी बारामतीतून (शरद पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष त्यांनीच फोन केला असे सांगण्याचा प्रयत्न ) फोन आल्याने विरोधी पक्षातील नेते उपस्थित राहिले नाहीत, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.
रविवारी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर सोमवारी ( दि.१५ ) सिल्व्हर ओक , मुंबई येथे छगन भुजबळ शरद पवार यांना भेटायला गेले. शरद पवार यांनी त्यांना दीड तास ताटकळत ठेवल्याची ही चर्चा असताना मला काही वाट बघायला लावली नाही असे स्पष्ट करीत साहेब आजारी असल्याने झोपले होते. ते उठल्या नंतर माझी भेट झाल्याचे त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी समाजात आंतर वाढत चालले आहे हे अंतर कमी करण्यासाठी व आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करावेत यासाठी मी पवार साहेब यांना भेटलो असे छगन भुजबळ यांनी त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले, असेल तरी रविवारी बारामतीत जावून शरद पवार यांच्यावर टीका केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी कोणतीही वेळ न घेता किंवा तसा निरोप नसताना ही भुजबळ पवारांच्या भेटीला गेल्यामुळे चर्चा सुरू असतानाच खासदार सुनेत्रा पवार ही आज मोदी बागेत जवळ पास दीड तासापेक्षा जास्त वेळ उपस्थित असल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.
मला भेटीबाबत काही माहिती नाही ..मी माहिती घेऊन बोलतो
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही भाष्य केलं आहे. “सुनेत्रा पवार यांच्या ‘मोदी बाग’ येथील भेटीबाबत मला काहीही माहिती नाही. मी माहिती घेऊन बोलेल. ही कौटुंबिक भेट सुद्धा असू शकते. पवारसाहेबांची प्रकृती ठीक नाही. राज्यात काहीही वेगळं चालेलं नाही. महायुतीत सत्तेत येणार हे नक्की,” असा विश्वास सुनील तटकरेंनी व्यक्त केला.