पिंपरी चिंचवडपुणे

आरक्षणाच्या सोडतीचा मुहूर्त ठरला

  • ९ ते ११ नोव्हेंबर दरम्यान निघणार सोडत
  • इच्छुकांचे लक्ष ; आयुक्तांच्या विचारांती ठरणार अंतिम तारीख

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

पिंपरी -चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडतीसाठी ९ ते ११ नोव्हेंबर ही तीन दिवस मुदतीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार अनुसूचित जाती २०, अनुसूचित जमाती ०३, इतर मागास ३५ आणि खुल्या गटातील ३५ जागांवर महिलांचे आरक्षण सोडत निघणार आहे. त्यामुळे प्रभागातील अ, ब, क आणि ड या जागा कोणाला सुटणार? याकडे सर्वच इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार आरक्षण सोडतीची माहिती ११ नोव्हेंबरला आयोगाला सादर करावी लागणार आहे. निवडणूक चार सदस्य पद्धतीने होणार आहेत. ३२ प्रभागातून १२८ नगरसेवक निवडले जाणार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी सहा ऑक्टोबरला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यामध्ये सहा प्रभागात बद्दल करण्यात आले आहेत. त्यामुळे आरक्षणात बद्दल होतील. आरक्षण निश्चितीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मार्गदर्शक अद्यादेश जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आरक्षण जागांची संख्या निश्चित करून ४ नोव्हेंबर पर्यंत त्यास आयोगाची मान्यता घ्यावी लागणार आहे. आरक्षण सोडतीची सूचना ८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. आरक्षण काढून सोडतीचा निकाल आयोगाच्या मान्यतेसाठी ११ नोव्हेंबर रोजी सादर करावा लागणार आहे.

प्रभागातील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एस टी ), इतर मागास वर्ग (ओबीएसी ), तसेच खुल्या गटातील या सर्व राखीव जागांवर महिलांसाठी असलेल्या जागेचे चित्र कसे असेल याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

  • आयुक्तांच्या निर्णयांती निघणार सोडत

प्रभागनिहाय आरक्षण सोडतीची राज्य निवडणूक आयोगाचा आदेश प्राप्त झाला आहे. सोडत काढण्यासाठी दिनांक ९ ते ११ नोव्हेंबर अशी तीन दिवसाची मुदत आहे. आयुक्त यांच्याबरोबर चर्चा करून सोडत केव्हा काढायची याबाबत नर्णय घेण्यात येणार आहे.

सचिन पवार, उपायुक्त, निवडणूक विभाग, पिं. चिं. महापालिका

  • अंकशास्त्रचे ही मांडले जाऊ शकते गणित

कोणतीही निवडणूक असू देत त्यासाठी राजकीय पक्षासह संबंधित इच्छुक उमेदवार हे ज्योतिष शास्त्राचा आधार घेतात. त्यामध्ये निवडणुकांच्या अनुषंगाने संबंधित तारखाचे विशेष महत्व आहे. काहीजण मूलांक (जन्माची तारीख ) तर काही जण भाग्यांक (जन्माची तारीख, महिना आणि वर्ष यां सर्वांची येणारी बेरीज ) चा आधार घेतात. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडतीसाठी तीन दिवसाची मुद्दत देण्यात आली आहे. यापैकी एका तारखेला आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. त्याचा निर्णय आयुक्त घेणार असले तरी त्यांच्यावर अप्रत्यक्ष रित्या कंट्रोल असणाऱ्या पक्षाचे सरकार राज्यात सत्तेत असल्याने ९/ १०/ ११ या तीन तारखेमधून एक तारीख निश्चित करण्यात येऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामध्ये ९/११/२०२५ या तारखेमध्ये मूलांक (०९), भाग्यांक (०२), १०/११/२०२५ या तारखेमध्ये मूलांक (१०) तर भाग्यांक (०३) तर ११/११/२०२५ यां तारखेत मूलांक (११) तर भाग्यांक (०४) अशी येत आहे. अंक शास्त्रात विषम संख्यांना महत्व प्राप्त आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे ०३ बेरीज येणाऱ्या १० नोव्हेंबरला किंवा मूलांक ०९ येणाऱ्या ०९ नोव्हेंबर ला आरक्षण सोडत निघू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळत आहे.