मोठी बातमी : शरद पवारांच्या फोननंतर सूत्र फिरली; फडणवीसांनी फटकारल्यावर पडळकर नरमले
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभर संतपाची लाट उसळली आहे. या विधानावरून शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर पडळकर नरमले असून त्यांनी वादावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करीत टीका केली होती. आमदार पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून पडळकरांचा निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना फोन करून याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांचा सूर बदलला असून मी यापुढे असं वक्तव्य करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला होता. इथून पुढे अशी वक्तव्ये करू नका असे आदेश त्यांनी मला दिले आहेत. त्यांच्या सूचनेचे मी पालन करणार आहे. अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. आधी वक्त्यावर ठाम असणारे गोपीचंद पडळकर मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर नरमल्याचा पाहायला मिळाले.
वक्त्यव्यावर स्पष्टीकरण देताना काय म्हणाले पडळकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन येण्याआधी गोपीचंद पडळकर हे जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर ठाम होते. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा अपशब्द वापरले तेव्हा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता का ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईबद्दल काँग्रेसने एआयद्वारे व्हिडीओ तयार केला, तेव्हा पवारांनी पंतप्रधांनाना फोन करून निषेध व्यक्त केला होता का ? हे मला दाखवा . या विषयावर मी उद्या बोलणार आहे. राज्यभर माझ्या वक्तव्यावर निषेध होत असेल तर होऊ द्या . दरम्यान वादग्रस्त वक्तव्याबद्दल जयंत पाटील यांची माफी मागणार का असं पत्रकाराकडून विचारण्यात आल्यानंतर मी यावर नंतर बोलतो असं पडळकर यांनी म्हंटल आहे.

