पिंपरी चिंचवडपुणे

भोसरी विधानसभेत तगडे आव्हान

  • विधानसभा निवडणुकीत महायुती विरुध्द महाविकास आघाडी
  • स्थानिक पातळीवर मित्र पक्ष लढणार वेगवेगळ्या निवडणुका ?
  • विद्यमान आमदारांविरोधात एकास एक लढत की पुन्हा ये रे माझ्या मागल्या..
  • २०१९ पेक्षा २०२४ ची वेगळी निवडणूक
  • २०१९ चे मित्र उभा ठाकणार महायुतीच्या विरोधात
  • भाजप मधील अनेक नगरसेवक विरोधी भूमिकेत
  • आमदार मात्र कामाच्या जोरावर करणार विरोधकांचा सामना

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

शिरूर लोकसभा मतदारसंघात जरी महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले असले तरी त्यात झालेली लक्षणीय तूट , २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष असणारा शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे (उबाठा) प्रामाणिकपणे दिलेले निर्णायक मतदान परंतु त्यानंतर झालेली राजकीय स्थितंतरे त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत उबाठा गट बरोबर नसणे, मिशन लोटस साठी भाजप ने एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकसंघ शिवसेना फोडण्याचे केले काम त्यामाध्यमातून मतदारांमध्ये पसरलेली नाराजी, मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेले राजकारण आणि भाजप अंतर्गत असलेली नाराजी या सर्व गोष्टीमुळे २०२४ ची विधानसभेची निवडणूक ही भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करू शकते अशी चर्चा भोसरी विधानसभा मतदार संघात सुरू आहे.

हे जरी खरे असले तरी आमदार हे पैलवान असल्याने कोणतेही संकट पुढे आले तरी त्याला न डगमगता सामोरे जात मतदारसंघात नव्याने तयार झालेल्या सोसायटीमध्ये नागरी सुविधा व इतर अडीअडचणींना मार्ग करून देत असल्याने आणि या मतदारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असलेला पगडा आणि मतदार संघात असणारे त्यांचे समर्थक माजी नगरसेवक व त्यांच्याकडे असणारी युवक पदाधिकारी यांची टीम पाहता आमदार महेश लांडगे २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांच्या समोर तगडे आव्हान पुढे उभे राहिले तरी ते त्याला नक्की तोंड देवून ते विधानसभेची हॅट्ट्रिक करतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे.

त्यामुळे २०१९ पेक्षा २०२४ ची विधानसभा निवडणूक ही विद्यमान आमदार विजयी होणार का , का त्यामध्ये ते अयशस्वी ? होणार हे येणारा काळच ठरविणार आहे.

महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी लढत झाली तर महायुतीकडून विद्यमान आमदार म्हणून महेश लांडगे हेच उमेदवार असणार हे कोणा ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून यावेळी तगडे उमेदवार इच्छूक आहेत ; त्यापैकी एक म्हणजे अजित गव्हाणे हे होय. की ज्यांनी नुकताच अजित पवार गटाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी हातात घेण्यास सज्ज झाले आहेत. स्थायी समितीचे माजी सभापती आणि ज्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे चार वेळा नगरसेवक पद भूषविलेले आणि पूर्वाश्रमीचे भाजप मधून नगरसेवक पदाची कारकीर्द सुरू केली त्यामुळे पक्षातील आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी उत्तम संबंधामुळे अजित गव्हाणे हे आमदार लांडगे यांच्या समोर तगडे आव्हान उभे करू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

त्यांचा असणारा मतदारसंघातील सर्व पक्षीय संबंध, पै पाहुण्याचा गोतावळा , उद्योग व्यवसायानिमित्त विविध भागातील नागरिकांशी असणारा संबंध आणि पिंपरी चिंचवड शहरातील दुसरे शरद पवार असे ज्यांना संबोधले जाते असे माजी आमदार विलास लांडे यांचे मार्गदर्शन यामुळे अजित गव्हाणे हे आमदार लांडगे यांच्या समोर तगडे आव्हान उभे करू शकतात अशी चर्चा भोसरी मतदारसंघात आहे.

महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असणाऱ्या उबाठा गटाच्या रणरागिणी आणि ज्यांना २००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयाने थोड्या मताने हुलकावणी दिली तसेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा असताना ही भाजपच्या उमेदवार पेक्षा जास्त मते घेत आणि सर्व पक्षीय अपक्ष उमेदवार की ज्यांनी भोसरीची निवडणूक पहिल्यांदा अपक्ष म्हणूनच लढविल्यानंतर जिंकता येते हा इतिहास पुन्हा खरा करून दाखविलेले आमदार महेश लांडगे यांच्यानंतरची साद्या कार्यकर्त्यांच्या जोरावर दोन नंबरची जवळपास ४५ हजार मते घेणाऱ्या सुलभा उबाळे यांनी पुन्हा तयारी सुरू केली आहे.

काही झाले तरी मशाल चीन्हाचाच आमदार करण्यासाठी शिवसेनेने ही यावेळी कंबर कसली आहे. आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाने मिळविलेले यश आणि भाजप विरोधात असलेली नाराजी जसी लोकसभेत दिसली तशीच परस्थिती विधानसभा निवडणुकीत ही राहील आणि त्याचा फायदा आपल्याला होईल, त्यामुळे यावेळीचा भोसरी विधानसभेचा आमदार हा मशाल चीन्हवरच निवडूण आणण्यासाठी सुलभा उबाळे यांनी प्रयत्न सुरू केले असून त्यांनी ही मतदारसंघ पिंजून काढला आहे.

भाजप चे निष्ठावंत घराणे म्हणून ज्या घराकडे आजमितीस ही शहरातून पाहिले जाते अशा स्व.बाबासाहेब लांडगे आणि स्व.अंकुश लांडगे यांच्या घराचा वारसा असणारे , २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजप चा पहिला नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याचा मान ज्यांनी मिळविला असे युवा नेतृत्व रवी लांडगे यांनी ही विधानसभा २०२४ ची तयारी सुरू केली आहे. अभी नहीं तो कभी नहीं अशी भूमिका घेत त्यांनी पायाला भिंगरी बांधून मतदारसंघातील विविध भागात जाऊन आपली भूमिका स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. तसेच विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.

आमदार लांडगे यांच्या विरोधात मतदारसंघात अनेक घराणी तगडी असून त्यांच्या विरोधात बोलण्याचे धाडस कोणी करत नव्हते. ते धाडस रवी लांडगे यांनी करण्यास सुरुवात केल्याची चर्चा भोसरी मतदार संघात रंगली आहे. रवी लांडगे यांनी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष, महापालिका दोन वेळा नगरसेवक पद भूषविले आहे. त्यांना व त्यांच्या घराला मानणारा मोठा वर्ग भोसरी विधानसभा मतदारसंघात आहे त्याचबरोबर त्यांचे असणारे नातेगोते ही मोठे आहे.

भोसरी आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव नागरिकांसाठी रवी लांडगे यांनी हाणून पडला असे त्यांचे समर्थक ठामपणे सांगत आहेत. हे रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी महापालिकेच्या वतीने उभा करण्यात आले असून ते त्यांच्यासाठीच असणे आवश्यक आहे असे म्हणत त्याच्या विरोधात जन आंदोलन उभे करून त्या रुग्णालयाच्या खासगीकरणाचा डाव रवी लांडगे यांनी त्यावेळी उधळून लावला होता. त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीत याच रुग्णालयात जवळपास साडे आठ हजार रुग्णाचे प्राण वाचले तर हजारो रुग्णांनी येथे उपचार घेतले.

त्यामुळे ज्या सोयी सुविधा सर्वसामान्यांच्या आहेत त्या त्यांना मिळवून देण्यासाठी मला विधानसभेत जाण्याची संधी द्या असे आवाहन त्यांनी भोसरी विधानसभा मतदार संघातील मतदारांना करणे सुरू केले असून त्यांनी भोसरी व समाविष्ट गावामध्ये भेटीगाठीना सुरुवात केली आहे. नवीन चेहरा, महापालिकेत भाजप ची एकहाती सत्ता असतानाही स्व. अंकुशभाऊ लांडगे यांच्या वारसाला पदापासून वंचित ठेवल्याची सल रवी लांडगे समर्थकांमध्ये आणि त्याअनुषंगाने मतदार संघात पसरू लागल्याने रवी लांडगे यांना न्याय मिळाला पाहिजे या माध्यमातून भोसरी आणि समाविष्ट गावात त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत आहेत.

गाठीभेटी मध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक भाजप चे जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्याबरोबर काही उघडपणे तर काही जण छुप्या पद्धतीने त्यांना साथ देताना दिसत आहेत. त्यात स्व.अंकुशभाऊ लांडगे यांनी पक्ष संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची जी फळी उभी केली होती, त्यांना अडचणीच्या वेळी मदत केली होती ते सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि व्यवसायिक रवी लांडगे यांना साथ देताना दिसत असल्याने त्यांना कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळणार ? का ते अपक्ष ही तयारी करणार याकडे भोसरी विधानसभा मतदार संघाचे लक्ष लागले असून यावेळीची भोसरी ची निवडणूक एकतर्फी न होता ती तगडे आव्हान उभे करणार असल्याची चर्चा भोसरी मतदार संघात जोर धरू लागली आहे.