पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

अजितदादा हयात असते तर भाजपची हिंमत झाली असती का?

  • पुणे विधान परिषद जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात तिढा
  • पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष योगेश बहल उपस्थित केला प्रश्न

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

विधान परिषदेच्या १७ निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात राजकीय वातावरण तापलं आहे, मित्रपक्षांच्या काही जागांवरती इतर पक्ष दावे केले असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अशातच पुणे विधानपरिषद जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे असताना त्या जागेवर आता भाजपने दावा केला आहे. या दाव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकामध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातून अजित दादा हयात असते तर भाजपने पुणे विधान परिषदेवर हक्क दाखवण्याची हिंमत केली असती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष योगेश बहलांनी उपस्थित करुन नवीन राजकीय मुद्द्याला तोंड फोडले आहे. ते एका खासगी वहिनीला मुलाखत देताना बोलत होते.

विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीत एकमेकांच्या हक्काच्या जागेवर दावा सांगितला जाऊ लागला आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

पुण्यावरून भाजप राष्ट्रवादी, तर नाशिक व संभाजीनगरवरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. बहल एवढ्यावर थांबले नाहीत. अजितदादाच्या तुलनेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राजकारणात नवख्या आहेत, याचा फायदा भाजप घेऊ इच्छितो का? भाजपकडून दबावतंत्राचे राजकारण खेळलं जाऊ शकतंय का? असे प्रश्न त्यांना विचारले असता. कदाचित त्यांचा असा प्रयत्न असू शकतो, हे नाकारता येणार नाही, असं म्हणत बहलांनी नव्या राजकीय चर्चेला हवा दिली आहे. मात्र असं असलं तरी सुनेत्रा वहिनी खंबीर आहेत आणि त्या पुणे विधान परिषदेची आमच्या हक्काची जागा राष्ट्रवादीलाचं मिळवतील, असा विश्वास ही बहलांनी व्यक्त केला.

पुणे विधान परिषदेच्या जागेवरुन महायुतीत तिढा निर्माण होणार नाही, असा दावा दोन्ही बाजूंनी केला जात असला तरी योगेश बहलांच्या वक्तव्यामुळं राजकीय पडद्यामागे रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा रंगलीये. खरं तर अनेक वर्षांपासून पुणे जिल्हा काबीज करुन पवार कुटुंबियांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे भाजपचे मनुसबे आहेत. प्रत्येक निवडणुकीत या-ना त्या कारणाने भाजप हा मनसुबा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं टाकत आहे.

पुणे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने योगेश बहलांनी या राजकीय वास्तवाकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवल्याचं बोललं जातंय.विधान परिषद निवडणुकीचा महायुतीतील तिढा आज सुटणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची बैठक बोलावली आहे. वर्षा निवासस्थानी सायंकाळी होणाऱ्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत.