पिंपरी चिंचवडपुणे

पुणे विधान परिषद : राष्ट्रवादीच्या नावाखाली ‘भाजप’ ची खेळी यशस्वी

-उमेदवारीसाठी राष्ट्रवादीमध्ये आलेल्या उद्योगपतीच्या मुलाला उमेदवारी
–राष्ट्रवादीकडे तगडे उमेदवार असताना ही आयारामला संधी  
–राष्ट्रवादीने जागा राखली ; मात्र उमेदवार भाजपकडून केला आयात  

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

महायुतीमध्ये पुणे विधान परिषदेची जागा काही झाले तरी आपल्याकडेच घ्यायची यासाठी भारतीय जनता पक्षाने ताकद लावली होती. मात्र भाजपपेक्षा मतदारांची संख्या जास्त आहे, पारंपारिक ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी पुण्याची जागा प्रतिष्ठेची केली; आणि ती जागा आपल्याकडे ठेवण्यात त्यांना यश आले खरे ; मात्र, भाजपने मोक्याच्या क्षणी आपला मोहरा पुढे करत त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आपल्या पदरात पाडून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या जागेसाठी राष्ट्रवादीकडे तगडे उमेदवार असताना भाजप मधील माजी खासदाराच्या मुलाला उमेदवारी दिल्यामुळे पक्षांतर्गत नाराजी पसरली आहे. त्यामुळे आज अजितदादा हयात असते तर आम्हाला न्याय मिळाला असता अशा प्रतिक्रिया उमटल्या. महायुती म्हणून निवडणूक लढणार होता तर दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची  गरज काय  होती? अशा प्रतिक्रिया ही उमटल्या आहेत. जो उमेदवार दिला आहे तो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्यासाठी खरेच तळागळापर्यन्त जाणार का ? याबाबत ही  राष्ट्रवादीतील सर्वसामान्य कार्यकर्ते प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.

राज्यात १७ विधान परिषद जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे विधान परिषद जागेसाठी महायुतीकडून भाजपमधून उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे याना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काकडे याना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीतील इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी आमदार सुनील टिंगरे, विलास लांडे, दिलीप मोहिते यांच्यासह दीपक मानकर, सुरेश घुले, अमोल बालवडकर आदी इच्छुक होते. यातून उमेदवारी देणे अपेक्षित असताना राष्ट्रवादी काँग्रेसने नव्याने पक्षाचे सर्वाधिकार हातात घेतलेले खासदार पार्थ पवार यांनी मैत्रीसाठी पक्षनिष्ठेला पायदळी तुडविल्याची चर्चा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

अजितदादा यांच्या पाठीत खंजीर खोपसून  स्वतः आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक बरोबर घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच्याच मुलाला आता दादांच्या पश्च्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तगडे उमेदवार असताना ही उमेदवारी दिल्याने अनेकांनी खंत व्यक्त केली आहे.  जिथे ज्यांनी दादांशी दगा केला त्यांच्याच मुलाला उमेदवारी मिळत असेल तर  दादांच्या पश्चात सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून  पक्षात आम्हाला  स्थान मिळणार का ? ज्या हक्काने आम्ही अजितदादा यांच्याकडे प्रश्न घेऊन जात होतो तसे विक्रम काकडे यांच्याकडे जाऊ शकणार का ? असे व अशा सारखे अनेक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ही पडल्याचे पाहावयास मिळत आहेत.

महायुतीमध्ये भाजप हा  सर्वात मोठा पक्ष आहे. तरी ही त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्रित घेऊन सरकार चालवावे लागत आहे. भविष्यात येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्वबळावर महाराष्ट्रात राज्यात सत्ता प्रस्थापित करावयाची आहे हे सत्य आता लपून राहिलेले नाही, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात आहे. त्याअनुषंगाने  राज्यभर त्यांनी जिथे पक्ष कमी आहे तेथे ताकद वाढविणे सुरु केले आहे. त्यासाठी महायुतीमध्ये घटक पक्ष असणाऱ्या पक्षातील आमदार, खासदार यांच्यासह राज्यातील इतर पक्षात जे आमदार, खासदार आहेत त्यांच्यावर ही लक्ष ठेवून त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी हालचाली सुरु असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात आहे. जरी पुणे जिल्ह्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहारत भाजपने अनेक सत्ता स्थाने काबीज केली असलती तरी ही पुणे ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत ही पुणे ही जागा भाजपकडे घेण्यासाठी भाजप वरिष्ठानी प्रयत्न केले. मात्र त्यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत.

 राष्ट्रवादी काँग्रेसकडे तगडे उमेदवार इच्छुक असताना ही भाजपमधील माजी खासदार संजय काकडे यांचे सुपुत्र विक्रम काकडे याना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. हे जरी खरे असले तरी खासदार पार्थ पवार यांचे विक्रम काकडे हे मित्र असल्याचे भाजपने हे हेरल्याची चर्चा आहे. त्यानुसार भाजपनेच ही खेळी खेळली असावी अशी चर्चेला आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उधाण आले आहे. काही झाले तरी ही पुण्याची जागा आपल्याला मिळवावयाची यासाठी भाजपने कम्बर कसली होती.

 मात्र त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. त्यानंतर राष्ट्रवादीकडे जवळपास तळागाळापर्यंत पोहचलेले  असे  पाच ते सहा उमेदवार की  जे सर्वच निवडणुकीच्या दृष्टीने   तगडे होते. त्यांना डावलून काकडे याना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास संमती देत भाजपनेच ही खेळी केली नसेल कशावरून अशा पुण्याच्या राजकारणात वावड्या उठल्या आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील टिंगरे, भाजपकडून प्रदीप कंद यांनी ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी मागे घेण्याची तारीख ही गुरुवार दिनांक ४ पर्यंत आहे. त्यातच महायुतीच्या समोर महाविकास आघाडीकडून  श्रीकांत पाटील यांनी अर्ज  दाखल केला आहे. आमच्याकडे मतदानाचा आकडा कमी असला तरी ही निकाल वेगळा लागू शकतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पुण्यातील ज्येष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्याने गुरुवारी कोण उमेदवारी माघार घेणार, की महायुतीला बंडखोरीला सामोरे जावे लागणार, का आर्थिक निकषानुसार निवडणुका एकतर्फी होणार हे १८ जून नंतरच समजणार आहे.