पिंपरी चिंचवडमहाराष्ट्र

चाळीस वर्षाने महापौरपदी पुन्हा लांडगे 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रवी बाबासाहेब लांडगे 

उपमहापौरपदी शर्मिला बाबर बिनविरोध

सत्तारूढ पक्षनेतेपदी प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते पदी भाऊसाहेब भोईर 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या २७ व्या महापौर पदी भोसरी येथील प्रभाग क्रमांक ०६ चे दुसऱ्यांदा बिनविरोध नगरसेवक रवी बाबासाहेब लांडगे हे शुक्रवारी (दिनांक ०६) विराजमान झाले. लांडगे भावकीतील दुसरा  महापौर होण्यास तब्ब्ल ४० वर्षे  वाट पहावी लागली.  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १९८६ साली प्रथम महापौर होण्याचा मान हा भोसरीतील ज्ञानेश्वर लांडगे यांना मिळाला होता. रवी लांडगे यांच्या रूपाने  गावाला चौथे महापौरपद मिळाले आहे. त्यामध्ये  ज्ञानेश्वर लांडगे, विलास लांडे, मोहिनी लांडे आणि आता रवी लांडगे यांचा समावेश झाला आहे. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेता आणि विरोधी पक्षनेता निवड  निवडणूक शुक्रवारी (दिनांक ०६)  पार पडली.  सत्तावीसाव्या महापौरपदी भाजपचे रवि लांडगे यांची ) बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने महापौरपदासाठी अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लांडगे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी उपमहापौरपदासाठी भरलेला अर्ज मागे घेतला. त्यामुळे उपहापौरपदी भाजपच्या शर्मिला बाबर यांचीही बिनविरोध निवड झाली.

 महापौर, उपमहापौरपदासाठी सोमवारी ( २ फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. भाजपकडून प्रभाग सहा धावडेवस्तीमधून दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेल्या रवि लांडगे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांचा एकमेव अर्ज होता. त्यामुळे त्यांची निवड निश्चित होती. उपमहापौरपदासाठी निगडी, प्राधिकरणाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या भाजपच्या शर्मिला बाबर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने केवळ उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आकुर्डीचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या वैशाली काळभोर यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

महापाैर-उपमहापाैरपदासाठी आज शुक्रवारी (६ फेब्रुवारी) निवडणूक प्रक्रिया झाली. सकाळी ११ वाजता नवनिर्वाचित नगरसेवकांची विशेष सभा पार पडली. महापौरपदासाठी रवि लांडगे यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी असलेले सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी त्यांची  महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर उपमहापौरपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी माघारीच्या मुदतीत माघार घेतली. त्यामुळे भाजपच्या बाबर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. रवि लांडगे २७ वे महापौर तर शर्मिला बाबर याही २७ व्या उपमहापौर झाल्या आहेत. तसेच महानगरपालिका सत्तारूढ पक्षनेतेपदी भाजपचे नगरसेवक प्रशांत शितोळे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची निवड जाहीर करण्यात आली.