देहूरोड येथील केंद्रीय विद्यालय, ऑर्डनन्स फॅक्टरी येथे होणार भुयारी मार्ग
—खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
देहूरोड निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय व देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग (अंडरपास) मंजूर झाले आहेत. या भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यास सदन कमांड ब्रिगेडियर आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले भुयारी मार्गाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मावळचे शिवसेना श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
देहूरोड येथील सदन कमांड येथे एनचआय एमएसआरडीसी, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड , देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी प्रतिनिधी आणि ब्रिगेडर यांच्या प्रमुख आधिकारी व संबंधित विभागाचे प्रमुख यांच्या बरोबर विविध प्रश्नांसंदर्भात खासदार बारणे यांनी शनिवारी आढावा बैठक घेतली. सदन कमांड ब्रिगेडियर आशिष कटोज, कर्नल अमित श्रीवास्तव, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत यादव, एमएसआरडीसीचे उपअभियंता विकास पिंपळकर, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य कैलास पानसरे, शिवसेना देहूगाव शहर प्रमुख सुनिल हगवणे, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष राजेंद्र तरस, ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड एम्प्लॉय युनियन अध्यक्ष मोहन घुले उपस्थित होते. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील प्रलंबित प्रश्न, चालू असलेली कामे याचा आढावा घेण्यात आला.
खासदार बारणे म्हणाले, देहूरोड निगडी रस्त्यावर केंद्रीय विद्यालय व देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी या दरम्यान दोन भुयारी मार्ग मंजूर झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एमएसआरडीसीकडून भुयारी मार्गाला मान्यता मिळाली आहे. या भुयारी मार्गाचे काम सुरू करण्याबाबत चर्चा झाली. त्याला सदन कमांड ब्रिगेडियर आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने तत्वतः मान्यता दिली. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले काम सुरू होईल. काळोखे मळा ते हगवणे वस्तीदरम्यानचा रस्ता संरक्षण विभागाच्या जागेतून जातो. रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविण्यात येणार आहेत.
श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पुढील महिन्यात पंढरपूरला जाणार आहे. पालखी मार्ग संरक्षण विभागाच्या जागेतून जातो. या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्याला ब्रिगेडियर यांनी मान्यता दिली आहे. किवळे येथील महावितरणची लाईन संरक्षण विभागातून जात आहे. त्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

