…त्यापेक्षा शहरवासियांना भेडसावणाऱ्या प्रश्नाकडे लक्ष द्या
माजी आमदार विलास लांडे यांचा आयुक्ताना सल्ला
लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड
आधुनिकतेची कास धरणार शहर, देशातील स्मार्ट सिटी अशी ओळख निर्माण करणार शहर तसेच औद्योगिक क्षेत्रासह आयटी हबमुळे जगाच्या नकाशावर पिंपरी-चिंचवडने आपले नाव कोरले असताना, शहराला जगात कोण ओळखत नाही असे वादग्रस्त विधान करणे नवनिर्वाचित आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी प्रथम बंद करावे. त्याचबरोबर शहरवासियांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष द्यावे असा सल्ला माजी आमदार विलास लांडे यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड ही केवळ औद्योगिकनगरी नसून कामगारांची स्वप्ने पूर्ण करणारे शहर आहे. टाटा, बजाज, फोर्स यांसारख्या मोठ्या उद्योगांसह हिंदुस्थान अँटीबायोटिक्ससारखा देशातील पहिला औषधनिर्मिती कारखाना येथे उभारला गेला. त्यामुळे या शहराला औद्योगिक आणि कामगारनगरी अशी वेगळी ओळख मिळाली. विविध राज्यांतून हजारो कामगार येथे येऊन स्थायिक झाले असून त्यांनी शहराच्या प्रगतीत मोठा वाटा उचलला आहे.
शहराच्या जडणघडणीत अनेक दिग्गज नेत्यांचे योगदान असल्याचे सांगताना त्यांनी खासदार शरद पवार, दिवंगत अजितदादा पवार, प्रा. रामकृष्ण मोरे, अण्णासाहेब मगर आणि लक्ष्मण भाऊ जगताप यांचा उल्लेख केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे शहरात प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल आणि आधुनिक सुविधा उभारल्या गेल्या. “शहर वाढताना आम्ही प्रत्यक्ष पाहिले असून त्या विकासाचे साक्षीदार आहोत, असे लांडे यांनी यावेळी नमूद केले .
याशिवाय शहरात कार्यरत राहिलेल्या अनेक आयुक्तांनीही उल्लेखनीय कामगिरी केल्याचे लांडे यांनी सांगितले. दिलीप बंड, श्रीनिवास पाटील, श्रीकर परदेशी, आशिष शर्मा, राजेश पाटील यांसारख्या आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई, स्वच्छता मोहीम आणि शिस्तबद्ध प्रशासन या माध्यमातून शहराच्या विकासात मोलाची भर घातली. त्याच धर्तीवर विद्यमान आयुक्त विजय सूर्यवंशी यांनीही काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड शहराला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि औद्योगिक असा समृद्ध वारसा लाभलेला असून केंद्र शासनाच्या विविध योजनांचाही लाभ या शहराला मिळाला आहे. त्यामुळे या विषयावर अनावश्यक राजकारण न करता शहराच्या विकासाची उंची आणखी वाढवावी, असे आवाहन विलास लांडे यांनी केले.
—————————–

