आम्ही टप्यात आणून कार्यक्रम करतो : आमदार गोपीचंद पडळकर
- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला दिमाखात प्रवेश
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय प्राप्त केला. पडळकर बँकेत येऊ नयेत यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांनी प्रयत्न करुन ही पडळकर हे सर्वांना भारी पडल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील विरुद्ध आमदर गोपीचंद पडळकर असा सामना महाराष्ट्राच्या राजकारणात पाहावयास मिळत आहे. आमदार पडळकर संधी मिळेल तिथे जयंत पाटील यांच्यावर टीका करताना धन्यता मानताना दिसत होते.
जयंत पाटील हे राजाच्या राजकारणातील मुत्सद्दी नेते अशी त्यांची ओळख ; मात्र २०२४ च्या निवडणुकीमध्ये जत विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर आमदार झालेले गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत यांना बरोबर घेऊन जयंत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठविल्याचे दिसत होती.
त्यातून सांगली जिह्यात जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर असा सामना रंगल्याचे दिसत आहे. त्यात गेल्या पंचवार्षिक मध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आमदार जयंत पाटील यांची सत्ता होती. गेली पाच वर्षे बँकेचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी काम पाहिले. दरम्यान या काळात झालेली नोकरभरतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप आमदार पडळकर आणि खोत यांनी करुन त्याच्या चौकशी साठी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.
दरम्यान त्याबाबत अध्यक्ष मानसिंगराव नाईक व त्त्यांच्या संचालकांनी त्याबाबत न्यायालयात दाद मागून तेथे विजय संपादन केला. दरम्यान बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. ही निवडणूक होणार का? ती बिनविरोध होणार याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या असतानाच जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरध्वनीवरून चर्चा झाली आणि बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.
मात्र राजकारणातील वस्ताद असणाऱ्या जयंत पाटील यांनी डाव टाकून २१ पैकी १५ संचालक बिनविरोध केले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना शिंदे गट, भाजप, काँग्रेस पक्षाना बरोबर घेतले. ०६ जगासाठी निवडणूक जाहीर झाली. दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला. न्यायालयात त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. पडळकर यांनी त्यावर वरील न्यायालयात दाद मागत त्याठिकाणी विजय प्राप्त करुन पुन्हा ते बँकेच्या मैदानात आले. त्यांच्या विरोधात भाजप मधीलच विनोद पवार यांना उभे करण्यात महाविकास आघाडीला यश आले.
मात्र गोपीचंद पडळकर जत सोसायटी गटातून एकूण ८८ मतदानामध्ये ५४ विरुद्ध ३४ असा विजय प्राप्त केला. त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे. या विजयानंतर त्यांनी आम्ही टप्यात आल्यावर नव्हे टप्यात आणून कार्यक्रम करतो अशी जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष चेतवणीच दिल्याचे दिसत आहे.

