भोसरी आणि चिंचवड विधानसभेत भाजपच्या अस्तित्त्वाची लढाई
- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आमदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न
- महाविकास आघाडी दोन्ही आमदार यांच्याविरोधात आक्रमक
- महायुतील घटक पक्ष वेट अँड वॉचच्या भूमिकेत
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात तीन विधानसभा मतदारसंघ येतात. पैकी भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार महेश लांडगे आणि आमदार अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप हे तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णासाहेब बनसोडे हे महायुतीचे आमदार नेतृत्व करीत आहेत. पैकी भोसरी आणि चिंचवड मध्ये प्रतिनिधित्व करीत असणाऱ्या भाजप आमदारांची ही अस्तित्वाची लढाई आहे. स्वकीय साथ सोडून जाणे, त्यांच्याकडून होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, विरोधी पक्षाकडून चारी बाजूने करण्यात येणारी कोंडी, लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला बसलेला फटका, मराठा, ओबीसी आरक्षणाचा वाढता प्रभाव या सर्व गोष्टींचा विचार केल्यास भोसरी आणि चिंचवड विधानसभा निवडणुक ही भाजप च्या अस्तित्वाची लढाई असल्याचे चित्र सद्या तरी पहावयास मिळत आहे.
भोसरीत आमदार महेश लांडगे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
भोसरी विधानसभेसाठी महायुतीकडून आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांच्याविरोधात महाविकस आघाडीकडून निवडणूक लढण्यास जवळपास चार तगडे उमेदवार प्रयत्न करीत आहेत. २०१९ च्या निवडणुकीत अधिकृत पक्षाला उमेदवार देता आला नाही असा प्रचार आमदार लांडगे यांच्या समर्थकांनी केला होता ; परंतु २०२४ च्या निवडणुकीत त्याच्या अगदी उलटी परस्थिती दिसून येत असून आमदार लांडगे यांच्या विरोधात लढण्यासाठी तगडे चार उमेदवार तयार असून ऐनवेळी मैदानात कसलेला ही उमेदवार येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सर्वांनी आमदार लांडगे यांनाच टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या आशीर्वादाने महापालिका क्षेत्रात कोट्यवधी रुपयाचे भ्रष्टाचार करण्यात आल्याचे आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहेत, त्यांच्या समर्थकांनी केलेली कामे आणि त्यातील घोटाळे हे जनतेसमोर आणण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यात भामा आसखेड जॅकवेल कामातील भ्रष्टाचार, छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकरणात चौथर्याची जागा बदलण्यात झालेला भ्रष्टाचार, छत्रपती संभाजी राजे यांच्या पूर्णाकृती १०० फूटी पुतळ्याच्या मोजडीला गेलेले तडे या प्रमुख कामाबरोबरच इतर कामामध्ये ही होत असलेले भ्रष्टाचार (विरोधकांचे आरोप) मुद्दे पुढे करून आमदार लांडगे यांना कात्रजचा घाट दाखविण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रावर आमदार महेश लांडगे यांची स्वाक्षरी प्रिंट केल्याचा मुद्दा ऐरणीवर आणून आमदार महेश लांडगे यांच्या या कृतीचा निषेध करण्यात आला. (त्याबाबत आमदार महेश लांडगे यांनी समाज माध्यमावर येऊन अनावधाने त्या रिक्षा चालकाने लावलेल्या हूड बाबत दिलगिरी व्यक्त करीत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला).
तसेच त्यांच्या मनमानी कारभारावर (भाजप मधून बाहेर पडलेल्या नगरसेवक यांनी केलेल्या आरोपानुसार ) नाराज होऊन भाजप मधील अनेक नगरसेवकांनी पक्षातून बाहेर पडून आमदार लांडगे यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळत कोणते भरीव काम केले याबाबत प्रश्न विचारण्यात येऊ लागल्याने आमदार महेश लांडगे यांच्या अनुषंगाने ही लढाई अस्तित्वाची बनली असून गेल्या दोन पंचवार्षिक मध्ये त्यांनी तयार केलेल्या प्रतिमेला तडा घालविण्यासाठी चारी बाजूने महाविकास आघाडीकडून त्यांची कोंडी करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
चिंचवड पक्षांतर्गत राजकीय महत्वकांक्षा
चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप नेतृत्व करीत आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ यांच्या निधनानंतर चिंचवड मध्ये जगताप कुटुंबाला पक्षांतर्गत आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. लक्ष्मण भाऊ यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीच्या निवडणुकीमध्ये अश्विनी ताई आणि शंकर जगताप यांच्यामध्ये उमेदवारीवरून वाद (राजकीय वर्तुळातील चर्चा ) रंगला होता. त्यामधे पक्षाने अश्विनीताई यांना उमेदवारी देऊ केली. त्यामध्ये त्या विजयी झाल्या होत्या, परंतु मताधिक्य घटल्याने त्याला जबाबदार कोण ? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.
येणाऱ्या निवडणुकीसाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी फिल्डिंग लावली आहे. काही झाले तरी ही निवडणूक लढणाराच असा त्यांनी चंग बांधला आहे. त्यामुळे उमेदवारीवरून आमदार अश्विनीताई आणि शंकर जगताप यांच्यात अंतर्गत कलह निर्माण झाला होता. दरम्यान उमेदवारी मिळाली नाही तर पक्ष बदलण्याची ही चर्चा रंगली होती. परंतु शंकर जगताप यांनाच उमेदवारी साठी मदत करणार असल्याचे आ.अश्विनीताई यांनी जाहीर केल्याचे वरवर दिसत असले तरी त्या ही पुन्हा इच्छूक असल्याची भाजपच्या अंतर्गत गोटात आजही चर्चा? आहे.
वरवर जरी घरगुती कलाहवर सद्या तरी पडदा पडला आहे ; परंतु पक्षांतर्गत इच्छुकांनी उमेदवारीसाठी उचल घेतली आहे. तसेच शंकर जगताप यांच्या पक्षांतर्गत शह काटशहाच्या राजकारणामुळे हैराण असणाऱ्या नगरसेवक व पदाधिकारी यांनी पक्षाला सोडचिठठी देण्यास सुरुवात केली आहे. त्याचा ऐन निवडणुकीमध्ये विपरीत परिणामाना सामोरे जावे लागणार आहे.
चिंचवड विधानसभेसाठी शंकर जगताप यांच्याबरोबर शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते यांनी ही तयारी सुरू केली आहे. यावेळी पक्ष आमच्या उमेदवारीचा निश्चित विचार करेल असा विश्वास काटे आणि नखाते यांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी सुद्धा सुरू केल्या आहेत. पक्षाने जर आमचा यावेळी विचार केला नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा ही पक्षांतर्गत इच्छुकांनी दिल्यामुळे जगताप यांना पक्षातूनच आव्हान मिळत आहे.
त्यामुळे भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात स्वपक्षीय इच्छुकाबरोबर महायुतीतील घटक पक्षाकडून होणारे कुरघोड्यांचे राजकारण, महाविकास आघाडी ने सर्व नाराजना एकत्रित करून महायुतीच्या विरोधात बांधलेली मोट, मराठा, ओबीसी आरक्षण मुद्दे यांच्यामुळे भाजपला दोन्ही जागा राखण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.