पिंपरी चिंचवडपुणेराजकीय

…यापुढे गोंधळ घातल्यास थेट निलंबन 

  • महापौर रवी लांडगे यांनी दिला स्वपक्षीय नगरसेवकांना इशारा 
  • महापौरांच्या आक्रमक भूमिकेने भाजप नगरसेवकांच्या बैठकीत पसरली शांतता 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

भाजप एक कुटुंब आहे. सर्वाना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येकाला सभागृहात बोलण्याची संधी देतो आहे. त्यानंतरही मध्येच कोणी उठतोय, बोलतोय हे  सहा महिन्यापासून  पाहतोय ; आता माझी सहनशीलता संपली आहे.

मी आता कोणाचेच  ऐकणार नाही. गोंधळ घातल्यास थेट निलंबन केले जाईल. असा इशारा महापौर रवी लांडगे यांनी भाजप नगरसेवकांना दिल्याचे समजते.  महापौरांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर सर्व नगरसेवकांमध्ये मात्र शांतता पसरली होती.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची ऑगेस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांची मंगळवारी (दिनांक ०१)  महानगरपालिकेत बैठक झाली. या बैठकीत महापौरांनी आक्रमक भूमिका घेत स्वपक्षाच्या नगरसेवकांना सज्जड दमच भरला. तसेच सभा, कामकाज, सभागृहाची प्रतिष्ठा नगरसेवकांमधील समन्व्य, विषयावरील चर्चा आणि सभागृहातील शिस्त याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. 

सभागृहात वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, आक्षेपार्ह भाषा, घोषणाबाजी, गोंधळ, महापौरांच्या आदेशांचे उल्लंघन, सभागृहाच्या प्रतिष्ठातेला बाधा पोहचणार नाही, सभागृहातील शिस्तीचे उल्लंघन झाल्यास नगरसेवकांविरुद्ध कारवाईचा ही इशारा देण्यात आला. प्रत्येकाने सभागृहाची प्रतिष्ठा राखावी. कोणत्याही विषयावर बोलण्यासाठी सदस्यांनी हातवर करून परवानगी घ्यावी. बोलण्याची संधी मिळाल्यानंतरच मत मांडावे.

एकाच वेळी अनेकांनी बोलणे, इतरांच्या भाषणात  अडथळा आणणे, अथवा सभेच्या कामात व्यत्यय निर्माण करणे टाळावे. चर्चेदरम्यान संबंधित विषयापुरतेच बोलावे, आणि विषयाशी संबंध नसलेले अवांतर वक्तव्य  टाळावे. अशा सूचना महापौर लांडगे यांनी नगरसेवकांना दिल्या.

विषयावर उपसूचना मांडावयाची असल्यास ती  सभेच्या एक दिवस अगोदर लेखी स्वरूपात सादर करावी. त्यामुळे संबंधित उपसूचना मूळ प्रस्तावाशी सुसंगत आहे का? याबाबत प्रशासकीय बाबी तपासून सभागृहापुढे मांडता येतील. ऐनवेळी सादर करण्यात येणाऱ्या उपसूचना स्वीकारल्या जाणार नाहीत. असेही बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आले.

तहकूब सभेतील विषय सर्वसाधारण सभेत घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने महापौरांसह आयुक्तांना नोटिसा बजाविली आहे. परंतु सभा घेण्याचा महापौरांचा अधिकार आहे. प्रशासनाशी चर्चा करूनच सभा नियोजित केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून होणाऱ्या आरोपांना भाजपच्या कोणीही उत्तर द्यायचे नाही. प्रशासन त्यांना उत्तर देईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.