पिंपरी चिंचवड

बिल्डरांना डोळ्यासमोर ठेऊन पिपंरी डेअरी फार्म आणि पिंपळे सौदागर येथील पवना नदीवरील पाडलेल्या बंधारा पुनर्बाधणी कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

  

  • शहरावर पाणी टंचाईचे सावट
  • जलस्तोत्रे पुनर्जिवीत करण्याकडे पालिका प्रशासनाकडून कानाडोळा 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

पिंपरी चिंचवड शहरावर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. अगोदरच नऊ  ते दहा वर्षांपासून दिवसा आड पाणी पुरवठा होत आहे. त्यात सध्या  पावसाने दडी मारल्याने मिळत असलेल्या पाणी वाटपात दहा टक्के कपात करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

यासाठी जुनी जलस्तोत्रे पुनर्जीवीत करणे आवश्यक झाले आहे. अनेक जलस्तोत्रे विविध कारणांनी बंद झाली आहेत, तर त्यातील  काही आर्थिक आणि राजकीय दबावामुळे ते जमीनदोस्त करण्यात आले आहेत. त्यातीलच महत्वाचे जलस्तोत्र म्हणजे पिंपरी डेअरी आणि पिंपळे सौदागर  येथील  पवना नदीवरील बंधारा. 

 मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याचे कारण देऊन ते  काही वर्षांपूर्वी जमीनदोस्त करण्यात आला होते  ; मात्र आता पाणी कपात संकट पाहता हे  जलस्तोत्र पुन्हा पुनर्जीवीत करणे आवश्यक आहे. परंतु, ठराविक बांधकाम व्यवसायिकांना डोळ्यासमोर ठेऊन व्यवसायिक पुररेषा मर्यादित ठेवण्याच्या हेतूने याला  पुनर्जीवीत करण्यासाठी प्रशासन याकडे  दुर्लक्ष करत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्याअनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते अमोल उबाळे यांनी महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत हे  बंधारे  पुन्हा  बांधावेत आणि पाणी टंचाई च्या काळात ही जलस्रोत पुन्हा पुनर्जीवीत करावीत अशी मागणी केली आहे. 

हे बंधारा उभे असताना पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव आणि चिंचवड या संपूर्ण परिसरातील पवना नदी वर्षभर पाण्याने भरलेली असायची. डेअरी फार्ममधील गायी-म्हशींसह परिसरातील जनावरांना या पाण्याचा मोठा आधार होता. तसेच, भूजलाच्या उच्च पातळीमुळे आजूबाजूच्या गावातील विहिरी आणि बोअरवेलना वर्षभर पाणी असायचे. परंतु, बंधारा नष्ट केल्यापासून भूजल पातळी वेगाने खालावली असून नदीपात्रात केवळ दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

बांधकाम व्यवसायिकांचा विरोध

सध्या काही स्वार्थी बांधकाम व्यावसायिक पूररेषा मर्यादित ठेवण्याच्या कारणावरून या बंधाऱ्याच्या पुनर्बाधणीला अप्रत्यक्ष विरोध करत आहेत. मोजक्या  व्यावसायिक फायद्यासाठी आणि दबावामुळे या महत्त्वाच्या सार्वजनिक कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप उबाळे यांनी केला आहे. जनहित आणि पर्यावरण रक्षणाला प्राधान्य देऊन प्रशासनाने कोणत्याही दबावाखाली न येता, पिंपरी डेअरी फार्म व पिंपळे सौदागर येथील पाडलेल्या बंधाऱ्याची त्वरित पुनर्बाधणी करावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.