पिंपरी चिंचवडपुणे

कर्तव्यावर मद्यधुंद अवस्थेत आढळल्याच्या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन

  • विभागीय चौकशीचे आदेश 
  • रुग्णालयातील अत्यावश्यक सेवांच्या कामकाजात अडथळा निर्माण झाल्याची गंभीर दखल

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव अविनाश म्हस्के यांना कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून मद्यधुंद अवस्थेत आढळल्याच्या प्रकरणी तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. 

या प्रकरणामुळे रुग्णालयातील अत्यावश्यक सेवांच्या कामकाजात अडथळा निर्माण झाल्याची बाब समोर आल्याने महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी याबाबतचे निलंबन आदेश जारी केले असून, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यासही मान्यता दिली आहे.

डॉ. वैभव म्हस्के हे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-ब संवर्गातील वैद्यकीय अधिकारी असून, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कार्यरत आहेत. वैद्यकीय सेवा ही रुग्णांच्या आरोग्याशी आणि जीवनाशी थेट संबंधित असल्याने या सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्ये जबाबदारीने, सचोटीने आणि समर्पित भावनेने पार पाडणे अपेक्षित आहे. मात्र, डॉ. म्हस्के हे दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून मद्यधुंद अवस्थेत आढळल्याची बाब रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती.या प्रकरणी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी सादर केलेला अभिप्राययुक्त अहवाल आणि महापालिका आयुक्तांची मान्यता विचारात घेऊन प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे. 

कर्तव्यावर असताना मद्याच्या प्रभावाखाली राहणे आणि त्यामुळे कर्तव्यपालनावर परिणाम होणे हे शासकीय सेवकांसाठी निर्धारित आचारसंहितेच्या विरोधात असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ आणि नियम २८ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ (१) यांचा भंग झाल्याचा निष्कर्ष निलंबन आदेशात नोंदविण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ (२) मधील तरतुदींनुसार डॉ. म्हस्के यांना आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ नुसार त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

विभागीय चौकशीच्या अनुषंगाने संबंधित रुग्णालय प्रशासनाला आदेशाची अंमलबजावणी करून त्याची पोहोच सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, चौकशीसाठी १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देशही आदेशात देण्यात आले आहेत.निलंबन कालावधीत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार असून, त्यासाठी विहित अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. या कालावधीत त्यांना अन्य कोणत्याही ठिकाणी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. निर्वाह भत्ता मिळविण्यासाठी अन्यत्र सेवा, नोकरी अथवा व्यवसाय केला नसल्याचा स्वाक्षरीयुक्त दाखला दरमहा २० तारखेच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. 

तसेच, निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पिंपरी येथे राहणार असून, वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणी लागू असलेल्या सेवा नियमांनुसार कारवाई सुरू केली असून, विभागीय चौकशीच्या माध्यमातून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.