क्रीडा

वर्ल्ड चॅम्पियन ऑफ लिजेंड्स क्रिकेट स्पर्धा ; भारताने पाकिस्तानला ५ गडी राखून धूळ चारत पटकाविले विजेतेपद

  • उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तान संघाला नमविले
  • अंबती रायडूची अर्ध शतकी खेळी ; अनुप्रितची उत्कृष्ट गोलंदाजी
  • युसुफ पठाण ची अंतिम सामन्यात ही उत्कृष्ट खेळी

लोकमान्य टाइम्स : क्रीडा वृत्तसेवा ऑनलाईन

वर्ल्ड चॅम्पियन ऑफ लिजेंड्स टी ट्वेण्टी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्णधार युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाचा ०५ गडी राखून दणदणीत पराभव करीत पहिल्याच वर्षी भरविण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियन ऑफ लिजेंड्स कप जिंकण्याचा मान भारताच्या संघाने पटकाविला.

अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाने युसुफ खानच्या नेतृत्वाखाली नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने २० षटकात ६ गाड्यांच्या मोबदल्यात १५६ धावा केल्या. त्यामध्ये मलिक ४१, के अकमल २४, मकसूद २१ आणि तन्नवीर नाबाद १९ धावांचा समावेश आहे. भारताकडून अनुप्रितने ४३ धावांच्या बदल्यात ३, इरफान पठाण ने १२ धावांच्या मोबदल्यात १, नेगिने २४ धावांच्या बदल्यात १ तर विनय कुमारने ३६ धावांच्या बदल्यात १ गडी बाद केला.

पाकिस्तानने दिलेल्या १५७ धावांचा पाठलाग करताना भारताने हे आव्हान १९.१ षटकात ५ गड्यांच्या बदल्यात पूर्ण करीत पहिला वर्ल्ड चॅम्पियन लिजेंड्स कप जिंकण्याचा पराक्रम केला. डावाची सुरुवात रॉबिन उथापा आणि अंबती रायडू यांनी केली. परंतु वैयक्तिक ०४ धावा झाल्या असताना उथापा बाद झाला. त्याच्या जागेवर आलेला सुरेश रैना ही १० धावा काढून परतला. भारताची सुरुवात निराशाजनक झाल्यामुळे या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणारा पाकिस्तान संघ अंतिम फेरीत सहज विजयी होणार अशी भीती भारतीय प्रेक्षकांना लागून राहिली होती.

परंतु अंबती रायडू याने गुरुखित सिंगला याच्याबरोबर भारताचा डाव सावरण्याबरोबरच पॉवर प्ले मध्ये दहा च्या आसपास धावगाती ठेवण्यात यश मिळविले. पॉवर प्ले संपला त्यावेळी भारताची स्थिती ही दोन गडी बाद ५५ अशी होती. १० व्या षटकात भारताची धावसंख्या २ बाद ८९ होती. दरम्यान रायडू आणि गुरुखीत सिंग यांची भागीदारी ४१ चेंडूत ५१ धावावर पोहचली होती. दरम्यान रायडू ने २९ चेंडूत ५० धावा करीत आपले अर्ध शतक पूर्ण केले होते. तो मोठी खेळी करणार असे वाटतच असताना त्याने अझमल ने टाकलेला चेंडूवर मोठा फटका लगविण्याच्या नादात झेलबाद झाला. त्यावेळी भारताची धावसंख्या १२ षटकात ३ गडी बाद १०० अशी झाली होती.

अंबती रायडू बाद झाल्यानंतर मैदानात कर्णधार युवराज सिंग उतरला. दरम्यान गुरूखित सिंग हा उत्तम खेळी करीत होता. कर्णधार युवराज याने गुरूखित मोठे फटके मारीत आहे म्हंटल्यावर त्याला खेळण्याची संधी दिली. दरम्यान गूरुखित हा ३४ धावावर झेलबाद झाला. त्याला सोहेब मलिकने के अकमल कडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर अंतिम फेरीच्या अगोदर सलग तीन सामन्यात अर्ध शतकी खेळी करणारा युसुफ पठाण मैदानात उतरला. युवराज सिंग आणि युसुफ पठाण यांनी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया विरोधात स्फोटक फलंदाजी केली होती.

त्या खेळीस साजेशी खेळी करीत युसुफ आणि युवराज सिंग यांनी भारताचा विजय जवळ आणला. दरम्यान युवराज सिंगचा झेल सोहेव मलिक आणि युसुफ पठाण चां झेल अमीर ने सोडल्याने पाकिस्तान विजया समीप आला असताना त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. युसुफ ने ३० धावा केल्या. त्यानंतर त्याच्या जागेवर इरफान पठाण मैदानावर उतरला. त्याने विजयासाठी दोन धावांची गरज असताना चौकार ठोकून भारताचा विजय पक्का करीत पहिल्या वर्ल्ड चॅम्पियन लिजेंडस स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले.