राजकीयसांगलीसातारा

सांगली पाठोपाठ सातारा जिल्हा परिषदमध्ये ही भाजपा राहणार सत्तेविना

  • महायुतीतील  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या विरोधात एकत्रित 
  • शंभूराजे देसाई,  मकरंद पाटील ठेवणार  शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांना सत्तेपासून दूर 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

मिनी विधानसभा समजले जाणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीतील  घटक पक्ष सरसावल्याचे दिसत आहे. भाजपचे   मंत्री, आमदारांचा अतिआत्मविश्वास त्यांना सत्तेपासून दूर घेऊन जात असल्याचे दिसत आहे. बुधवारी (१८) सांगली मध्ये सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपला आता शुक्रवारी (दिनांक २०) ही  सातारा जिल्ह्या परिषदेमध्येही सत्तेविना राहावे लागणार असल्याची जोरदार चर्चा सातारा जिल्ह्यामध्ये आहे.  

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी (दिनांक २०)  होणार आहे. कोणत्या पक्षाचा अध्यक्ष होणार, याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लगाले आहे. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा मानस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाळगल्याची चर्चा आहे. 

सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक चांगलीच गाजली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवत स्वबळावर जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले. या निवडणुकीत भाजपचे जयकुमार गोरे यांनी मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका करत त्यांच्या मतदारसंघांमध्ये लक्ष घातले होते. त्यावरून महायुतीतील घटक पक्षात आरोप प्रत्यरोपाच्या जोरदार फैरी झाडाल्या होत्या.  

भाजपने या निवडणुकीत २७ जागा जिंकल्या, राष्ट्रवादीने २०  तर शिवसेनेने १५ जागांवर विजय मिळवला ; मात्र निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने आणि शिवसेनेने अनेक जागांवर तडजोडी करत एकत्रित निवडणूक लढवण्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे एकत्र राहत अध्यक्षपद स्वतःकडे खेचतील अशी शक्यता  सातारा जिल्ह्यातील राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजप सर्व गोष्टीचा वापर करते हे त्यांच्यासोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांना अवगत आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे  निवडूण आलेले सर्व जिल्हा परिषद सदस्यांना एकत्रित पर्यटणासाठी पाठविले होते.  त्यामध्ये कोणता ही  दगा फटका होऊ नये याची पुरेपूर काळजी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याचे दिसत आहे. शुक्रवारी (दिनांक २०) होणाऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्यावेळीच सर्व सदस्य एकत्रित येणार आहेत असे समजते. 

गेल्या काही दिवसांपासून भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल असे विधान जयकुमार गोरे करत आहेत. त्यामुळे कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी सावधानतेने पाऊले टाकत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.