राजकीयसांगली

अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने भाजपचाच  जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम

  • सांगलीच्या राजकारणाचा मीच वस्ताद असल्याचे जयंत पाटलांनी दिले दाखवून 
  • काँग्रेस, शिवसेना, उबाठा आणि अजितदादा पवार गटाची बांधली मोट 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीपेक्षा महायुतीकडे एक सदस्य जास्तीचा असतानाही, जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता जवळपास निश्चित झाली आहे. गेली दहा वर्षे जिल्हा परिषद तब्यात ठेवणाऱ्या महायुतीच्या गडाला परफेक्ट नियोजन करुन जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप चा करेक्ट कार्यक्रम लावण्यात   महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील यांनी यश मिळविले आहे. त्याची बुधवारी (दिनांक १८) औपचारिकता बाकी आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंतराव यांना हलक्यात घेणे भाजपला  महागात पडल्याची चर्चा आहे. महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या अजितदादा  राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहापैकी ०५ सदस्यांना बरोबर घेत जिल्ह्याचा राजकारणातील वस्ताद मीच असल्याचे त्यांनी यावेळी  दाखवून दिले आहे. 

बुधवारी (दिनांक १८) सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदावर महाविकास आघाडीकडून संगीता पाटील यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड यांची निवड निश्चित मानली जात आहे. सांगली जिल्हा परिषदेचे एकूण ६१ सदस्यांचे बलाबल आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने १८ जागेवर विजय मिळवित सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळविला.  भाजप १६, काँग्रेस ११, शिव सेना एकनाथ शिंदे गट ०७, अजितदादा पवार राष्ट्रवादी ०६, शिवसेना उबाठा, जनसुराज्य पक्ष, रयत क्रांती पक्ष प्रत्येकी  ०१ जागेवर विजय मिळविला. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये स्थानिक पातळ्यावर दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढल्याचे पहावयास मिळाले. तर काही ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजप उमेदवारामध्ये जोरदार लढती झाल्या, दोन्ही घटक पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर जहारी टीका केल्याने निवडणुकानंतर महायुती म्हणून त्यांचे मनोमिलन होण्यास अडथळे निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. तरी ही महायुती धर्म पाळा असे वारंवार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आवाहन करुनही त्याला काही अंशी शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आजितदादा पवार गटाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सांगली जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या ताब्यात जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. 

महाविकास आघाडीकडून जयंत पाटील, खा. विशाल पाटील, आ. विश्वजीत कदम, माजी आमदार आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती चे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाकडून माजी मंत्री  शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यानुसार पाच वर्षे कोणाला किती वर्षे संधी द्यायची याबाबत धोरण निश्चित केले आहे. त्यामुळे बुधवारी सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा वरचष्मा राहणार आहे हे निश्चित मानले जात आहे. अध्यक्षपदी  जयंत पाटील गटच्या संगीता पाटील, उपाध्यक्षपदी आमदार विश्वजीत कदम गटाचे ऋषिकेश लाड यांची तर सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या सदस्यांसह आमदार रोहित पाटील गटासह, शिवसेना उबाठा गटाच्या एकमेव सदस्याची ही वर्णी लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

सांगली जिल्हा परिषद संख्येपैकी महाविकास आघाडी पेक्षा एका सदस्य महायुतीकडे  जास्तीचा आहे.   महायुतीतील हेवीवेट मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह  महायुतीचे पाच विधानसभा आणि एक विधान परिषद असे सहा आमदार  यांची ताकद असताना ही  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी कोणता ही गाजावाजा न करता शांततेत, कोणाला आव्हान न देता आपल्या इमेजला शोभेल अशा त्यांच्या डायलॉग प्रमाणे टप्यात आला की करेक्ट कार्यक्रम काय असतो  हे दाखवून देत,  सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचा मीच खरा वस्ताद आहे हे दाखवून दिल्याची जोरदार चर्चा सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आहे.