त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा ; प्रभाग क्रमांक १५ चे लोकप्रतिनिधी आक्रमक
- अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्याचे साडे ११०० लायन्स वाटणारे अधिकारी कोण?
- राजू मिसाळ, शर्मिला बाबर, शैलजा मोरे, अमित गावडे यांनी घेतला आक्रमक पवित्रा
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
निगडी प्राधिकरण परिसरात प्रशासकीय राजवटीत अनधिकृत टपऱ्या व हातगाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आमच्या एका प्रभागात जवळपास साडे ११०० पेक्षा जास्त लायन्स दिली आहेत. त्यामुळे फूटपाथच राहणार नाहीत. ही लायन्स वाटणाऱ्या अधिकाऱ्यावरच कारवाई करा, असा आक्रमक पवित्रा माजी महापौर, नगरसेवक राजू मिसाळ, उपमहापौर शर्मिला बाबर, माजी उपमहापौर नगरसेविका शैलजा मोरे, नगरसेवक अमित गावडे यांनी घेतला आहे .
महानगरपालिका भवनात बुधवारी (दिनांक १८) शहर अभियंता मकरंद निकम यांच्या उपस्थित प्रभाग क्रमांक १५ च्या अनुषंगाने बैठक पार पडली. यावेळी लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. यावेळी अ क्षेत्रीय अधिकारी घार्गे मॅडम , भूमी जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त सीताराम बहुरे, वाहतूक दळणवळण विभागाचे सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार, वाहतूक पोलीस निरीक्षक नीता गायकवाड, अ प्रशासन अधिकारी प्रिया गोरखे, पालिकेचे कायदा सल्लागार आगळे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान निगडी प्राधिकरणातील अधिकृत हॉकर्स झोनचा निर्धारित परिसर वगळता कोणत्याही फुटपाथवर एकही अनधिकृत टपरी अथवा हातगाडी दिसता कामा नये, अशी स्पष्ट व ठाम भूमिका माजी महापौर नगरसेवक राजू मिसाळ यांनी घेतली. आपण प्रशासकीय राजवटीत मनमानी केलीत असा आमचा आरोप आहे. जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे. लोकप्रतिनिधीचे रौद्ररूप पाहून महानगरपालिकेचे अधिकारी निशब्द झाल्याचे पहावयास मिळाले.
ही लायन्स पैसे घेऊन दिल्याचा ही चर्चा असल्याची टीका लोकप्रतिनिधी यांनी यावेळी केली. त्यामुळे नागरिकांच्या सोयी, सुरक्षितेसाठी आणि शहराच्या शिस्तब्ध विकासासाठी आवश्यक त्या सर्व उपया योजना तातडीने राबवा असा इशाराच उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी दिल्यामुळे प्रशासकीय राजवटीमध्ये मनमानी केलेल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधी यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे.
——————————-

