चिंचवड स्टेशन : रस्त्यालगत खणलेले खड्डे बनलेत धोकेदायक
- बुधवारी खड्ड्यात उलटला ट्रक ; परंतु जीवितहानी नाही
- त्या आशिर्वादामुळे ठेकेदाराची मनमानी ; स्थानिक नगरसेवकाचा आरोप
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
चिंचवड स्टेशनं रस्त्यालागत खड्डे खोदले आहेत. त्याठिकाणी सूचना फलक किंवा बॅरिकेट्स लावलेले दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. बुधवारी (दि. १ ) या खड्ड्यात एक ट्रक उलटला. सुदैवाने कोणती ही जीवितहानी झाली नाही. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे
एखाद्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे या खड्ड्यात कोणाचा तरी बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का? असा प्रश्न परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांनी उपस्थित केला आहे.
शहरात सध्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू आहे.मात्र, हे काम करताना ठेकेदारांकडून सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. कामाच्या ठिकाणी बॅरिकेट्स किंवा सूचना फलक नसल्यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे
यापूर्वीही अशाच प्रकारच्या निष्काळजीपणामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. ठेकेदारांच्या या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
वारंवार घडणाऱ्या या घटनांनंतर आता पिंपरी-चिंचवड प्रशासन संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
मंगळवारीच ठेकेदाराला केली होती सूचना
चिंचवड स्टेशनं येथे रस्त्यालगत खड्डे खणले आहेत. करदात्या शहर वासियांच्या सोयीसाठी नव्हे तर रस्त्यालगत सुरु असणाऱ्या विकसकांच्यासाठी ही जलवाहिनी टाकण्यासाठी खड्डे खणले आहेत. हे खड्डे त्वरित बुजवा, अन्यथा याच्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. महानगरपालिकेतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित या गोष्टीकडे लक्ष द्यावे. का? या खड्ड्यात एखाद्याचा बळी गेल्यावर जागे होणार आहात ? संबंधित ठेकेदाराला मंगळवारीच हे खड्डे बुजविण्यासाठी सूचना केल्या आहेत ; मात्र महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याच्या आशीर्वादामुळे हा ठेकेदार नागरिकांच्या जीवितशी खेळत आहे.
– विजय शिंदे : स्थानिक नगरसेवक
——————————

