पिंपरी चिंचवड

कचरा उचला अन्यथा महानगरपालिकेत कचरा टाकणार 

  • माजी विरोधी पक्षनेता मच्छिंद्र तापकीर यांचा प्रशासनाला इशारा
  • काळेवाडी-रहाटणीत कचऱ्याचे ढीग ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड 

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील काळेवाडी, रहाटणी, विजयनगरसह विविध परिसरांमध्ये कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नियमितपणे कचरा उचलला जात नाही.  परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जर हा कचरा त्वरित उचलला नाही तर हा कचरा महानगरपालिकेत आणून टाकणार असा इशारा माजी विरोधी पक्षनेता मछिंद्र तापकीर यांनी दिला आहे.

यासंदर्भात तापकीर यांनी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनात काळेवाडी, रहाटणी, विजयनगर, तापकीरनगर, भारतमाता चौक, नढेनगर, कोकणेनगर, पाचपीर चौक, आदर्शनगर आणि ज्योतिबानगर आदी परिसरांतील कचरा व्यवस्थापनाच्या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

सदर परिसरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साचत असून, नियमित कचरा संकलन आणि उचलण्याची प्रभावी व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांचा वावरही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.

विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचऱ्याच्या ढिगांमुळे डास, माश्या आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढत असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. महापालिका शहर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवत असल्याचा दावा करत असताना, शहरातील महत्त्वाच्या निवासी भागांमध्ये कचऱ्याची समस्या कायम राहणे ही चिंताजनक बाब असल्याचे तापकीर यांनी निवेदनात नमूद केले आहे.