पिंपरी चिंचवडपुणे

पुराव्याशिवाय स्थानिक नेतृत्वावर आरोप केल्यास भाजप ते सहन करणार नाही

  • आमदार रोहित पवारांच्या आरोपावर शहर भाजप मुख्य प्रवक्ता राजू दुर्गे यांचा इशारा
  • ठोस पुरावे आणि अधिकृत कागदपत्रासह भूमिका मांडण्याचे आव्हान
  • मोशी कचरा डेपो दुर्घटना : राष्ट्रवादी (श. प.) आणि भाजपात रंगले आरोप-प्रत्यरोप

पिंपरी चिंचवड : लोकमान्य टाइम्स वृत्तसेवा

मोशी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर चौकशीची मागणी करणे हा लोकशाहीतील प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, पुराव्यांशिवाय भाजपचे स्थानिक नेतृत्व आणि आमदार महेश लांडगे यांचे नाव घेऊन आरोप करणे आम्ही सहन करणार नाही.

पिंपरी-चिंचवड मधील भाजप लोकप्रतिनिधींवर आरोप करण्याऐवजी ठोस पुरावे आणि अधिकृत कागदपत्रांसह भूमिका मांडावी. केवळ राजकीय वक्तव्यांच्या माध्यमातून एखाद्या लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तथ्यांच्या आधारे योग्य प्रत्युत्तर देऊ असा इशारा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना पिंपरी चिंचवड शहर व जिल्हा भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते राजू दुर्गे यांनी दिला आहे.

मोशी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाचे आमदार रोहित पवार यांनी महानगरपालिका आयुक्ताना विविध मागण्याचे निवेदन दिले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदमध्ये सत्ताधारी भाजपच्या कार्यप्रणालीसह महानगरपालिका प्रशासनाबरोबरच स्थानिक नेतृत्व आणि आमदार महेश लांडगे यांचे नाव घेत त्यांनी टीका केली होती. त्याअनुषंगाने शहर भाजप मुख्य प्रवक्ते राजू दुर्गे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आमदार पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

दुर्गे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोशी दुर्घटना अत्यंत वेदनादायी असून मृतांच्या कुटुंबीयांचे दुःख शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. महानगरपालिकेकडून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, त्यासोबतच दुर्घटनेमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी वस्तुनिष्ठ चौकशी होणे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. भविष्यात अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहेत .

“राजकारण करायचे असेल तर विकासाच्या मुद्यांवर करा; मात्र मृतांच्या दुःखावर राजकारण करू नका. २०१७ पर्यंत आपल्याच पक्षाची सत्ता महानगरपालिकेवर होती. त्यावेळी शहराच्या कचरा समस्येवर आपल्या पक्षाने कोण-कोणत्या ठोस उपाययोजना केल्या याचे आत्मचिंतन करावे, असा सल्ला आमदार पवार यांना दुर्गे यांनी दिला आहे.पिंपरी-चिंचवड हे कोणत्याही एका व्यक्तीच्या राजकीय प्रयोगाचे मैदान नसून शहरातील प्रश्नांवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार जनतेचा आहे.

शहरातील जनतेने भारतीय जनता पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता दिली असून, नागरिकांनी दिलेल्या जनादेशाचा आदर सर्वांनी करावा, असेही दुर्गे यांनी नमूद केले. आज पिंपरी-चिंचवडसमोर कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न उभा आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या प्रश्नावर राजकीय श्रेयवाद करण्यापेक्षा विधायक चर्चा करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी ठोस निर्णय घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.