कचरा पेटणार ; भोसरी आणि चिंचवडचे नगरसेवक आमनेसामने
- भोसरी नगरसेवक : पुनावळ्यात कचरा डेपो करा
- -चिंचवडचे नगरसेवक : पुनावळे ऐवजी, पर्यायी जागा शोधा
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने आरक्षित केलेल्या पुनावळे येथील जागेत कचरा डेपो सुरू करण्याची आक्रमक मागणी सत्ताधारी भाजपच्या भोसरीतील नगरसेवकांनी केली. त्यानंतर चिंचवडमधील सत्ताधारी नगरसेवकांनी भोसरीतील नगरसेवकांच्या मागणीला विरोध दर्शविला.
पुनावळेतील कचरा डेपोचे आरक्षण रद्द झाले असून, त्यावर ऑक्सिजन पार्कसाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे त्या ऐवजी पर्यायी जागेचा शोध घ्यावा, असा सल्ला नगरसेवकांनी दिला. त्यामुळे पुनावळेतील कचरा डेपोसाठी आरक्षित जागेवरून सत्ताधाऱ्यामधील भोसरी आणि चिंचवडमधील नगरसेवक आमनेसामने आले आहेत. आता यामध्ये प्रशासनाची कसोटी लागणार आहे
माेशी कचरा डेपाेतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची तीन मजली अनधिकृत प्रशासकीय इमारत काेसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाला, तर बारा जण जखमी झाले आहेत. या घटनेचे बुधवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जाेरदार पडसाद उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहरातील कचरा समस्या गंभीर झाल्याचे मान्य केले. प्रशासनानेही मोशीतील कचरा डेपोला पर्याय शोधावा लागेल, असे स्पष्ट केले.
पिंपरी चिंचवड शहराचा कचरा मागील ३० ते ३५ वर्षांपासून माेशीतच टाकला जात आहे. त्यामुळे तिथे कचऱ्याचे डाेंगर झाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन पुनावळे येथील आरक्षित जागेवर कचरा डेपाे तातडीने सुरू करण्याची मागणी भोसरीतील भाजपच्या नगरसेवकांनी केली. तसेच माेशीत कचराच टाकू देणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतली. महापालिका आयुक्तांनी कठाेर भूमिका घेऊन पोलीस बंदोबस्तात पुनावळेत कचरा टाकण्याची मागणी केली. महापालिकेचा विकास आराखडा अंतिम झालेला नाही. सुनावणीमध्ये डी पीमध्ये पुनावळेतील कचरा डेपोचे आरक्षण कायम ठेवण्याची मागणी भोसरीतील नगरसेवकांनी केली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील असलेले स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक राहुल कलाटे, कुणाल वाव्हळकर यांनी पुनावळेतील कचरा डेपोचे आरक्षण रद्द झाले आहे. तिथे कचरा डेपो करू नये, त्या ऐवजी पर्यायी जागेचा शोध घ्यावा, असा सल्ला दिला. त्यामुळे पुनावळे कचरा डेपाेच्या जागेवरून सत्ताधारी भाजपमधील भोसरी आणि चिंचवड विधानसभेतील नगरसेवक आमनेसामने आल्याचे दिसत आहेत.

