पिंपरी चिंचवडपुणेराजकीय

अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांच्या याद्या राजकीय पक्षांना वितरित

याद्या तपासून घेण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

लोकमान्य टाइम्स : पुणे

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार (ASDD) मतदारांच्या याद्या राजकीय पक्षांनी तपासून घ्याव्यात. चुकीने एखाद्या मतदाराचे नाव अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार मतदारांच्या यादीमध्ये समाविष्ट झाले असल्यास दुरुस्ती करुन घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अथवा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांना अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार मतदारांच्या याद्या वितरित करण्यात आल्या, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी म्हणाले, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या pune.gov.in संकेतस्थळावरही प्रभागनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत 17 ऑगस्ट पर्यंत मुदत असून प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना रोजचे उद्दिष्ट ठरवून याद्या तपासून घ्याव्यात. अडचणी असल्यास बीएलओ यांची मदत घ्यावी. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे ,(बीएलओ) नाव व संपर्क क्रमांकाची यादी संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. हरकतींवर सुनावण्या झाल्यानंतर काही नावे यादीत समाविष्ट होतील.

ते म्हणाले, राजकीय पक्षांनी प्रतिनिधींकडून यादी तपासल्याबाबत प्रमाणपत्र घ्यावे. राजकीय पक्षांच्या मदतीने कमीत कमी हरकती प्राप्त होतील आणि जास्तीत जास्त नावे मतदार यादीत समाविष्ट होऊन मतदार नोंदणीची टक्केवारी वाढेल, असा विश्वास श्री.डुडी यांनी व्यक्त केला.

बैठकीला नॅशनल पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार), भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आदी राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहरप्रमुख, सचिव तसेच प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपस्थित राजकीय पक्षांना एएसडीडी याद्यांच्या पेनड्राईव्हसह छापील प्रती देण्यात आल्या.