महाराष्ट्र

मराठा  लेकरांच्या भवितव्याशी खेळून देणार नाही : मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा 

  • मराठ्यांच्या नोंदीला हात लावला तर सरकारला भारी पडेल 
  • महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  निशाण्यावर 
  • बावनकुळे तू ५२ कुळे तर आम्ही मराठे ९६ कुळे 
  • पश्चिम महाराष्ट्रात ही वाढता जनाधार 

सांगली : संजय शिंदे 

तुमच्या हातात महसूल विभाग आहे म्हणून मराठ्यांच्या लेकरांच्या भवितव्याशी खेळू देणार नाही,  मराठ्यांच्या नोंदींना हात लावाल तर सरकारला भारी पडेल.

 मराठा समाजाच्या नोंदी रद्द केल्या तर ते तुम्हाला महागात पडेल असा इशारा  देत  बावनकुळे तू ५२ कुळे आहेस; आम्ही ९६ कुळे मराठे आहोत असा थेट  इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी  दिला आहे. 

मराठा आरक्षणावर जनजागृती करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज  जरांगे पाटील  सांगली दौऱ्यावर आहेत.  आटपाडी येथील भवानी विद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या सभेत ते बोलत होते. पश्चिम महाराष्ट्रातील जनजागृती सभेला हजारोंचा जनाधार मिळताना दिसत आहे.   पुन्हा एकदा ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणानी उचल खाली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारलाही त्यांनी धारेवर धरले. मराठा-कुणबी नोंदी, कुणबी प्रमाणपत्रे, ओबीसीतून आरक्षण, शिक्षण-नोकरीतील संधी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ या प्रश्नांवर सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘महसूल विभाग तुमच्याकडे आहे म्हणून मराठ्यांच्या नोंदींशी खेळण्याचा अधिकार मिळत नाही. मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्याचा प्रयत्न का सुरू आहे? कोणाच्या आदेशाने हा प्रकार सुरू आहे?’ असा सवाल जरांगे-पाटील यांनी केला.

‘मराठ्यांच्या हक्काच्या नोंदींवर हात टाकला, तर हा डाव उधळून लावू. समाजात गैरसमज निर्माण करून आंदोलन कमजोर करण्याचे राजकारण आता चालणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर केलेली  प्रमुख विधाने 

  • मराठा समाजाच्या नोंदींना हात लावल्यास सरकारला त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशारा.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीशिवाय चंद्रशेखर बावनकुळे असे निर्णय घेऊ शकत नाहीत, असा आरोप.
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर “डबल गेम” केल्याचा आरोप करत, आपल्या मंत्र्यांना आवर घालण्याचे आवाहन.
  • मराठा समाजाच्या भवितव्याशी तडजोड होऊ देणार नसल्याचे स्पष्ट विधान.