पिंपरी चिंचवड

आयुक्त श्रावण हर्डीकरांना तिहेरी पातळीवर करावी लागणार ताळमेळाची रस्सीखेच

  •  निवडणुकीच्या तोंडावर  विविध आव्हानांना जावे लागणार समोरे  

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

कोण म्हणतंय अजित पवारांच्या सूचनांचे योग्य पद्धतीने पालन केले नाही म्हणून,  तर कोण म्हणतंय भाजपनेच डॅमेज कंट्रोलसाठी तर कोण म्हणतंय तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे तत्कालीन आयुक्त शेखर सिंग यांची बदली केली. कारणे कोणती असली तरी शहरात प्रशासकीय राजवटीमध्ये मात्र करदात्यांमध्ये नाराजीचा सूर होता आणि आहे.

विविध प्रकल्पामुळे शहरातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सिंग यांच्या जागेवर महामेट्रोचे व्यस्थापकीय संचालक आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त पदाचा अनुभव असलेले श्रावण हर्डीकरांना पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षात महापालिकेत  प्रशासकीय राजवटीमध्ये अब्जावधी रुपयांच्या भ्रष्टाचारचे  आरोप, राज्यात सत्ताधारी असणाऱ्या महायुतीतील घटक पक्षांचे शहरात  विविध दिशेला असणारी तोंडे आणि करदात्यांच्या अपेक्षांना न्याय या तिहेरी भूमिकते हर्डीकरांना ताळमेळाची रस्सीखेच करावी लागणार आहे. 

पदभार स्वीकारताच अधिकारी, कर्मचारी यांनी आयोजित केलेल्या रस्सीखेच मध्ये त्यांनी ताकतीने दोर ओढला खरा ; मात्र निवडणुकीच्या तोंडावर जोपर्यंत पदभार त्यांच्याकडे आहे तोपर्यंत त्यांना करदाते, पक्ष आणि प्रशासन पातळीवर मात्र तिहेरी भूमिका निभवावी लागणार असल्याने ते त्यामध्ये किती यशस्वी होतायत याकडे शहरवासीयांच्या नजर खिळल्या आहेत.  

 आयुक्त म्हणून हर्डीकरांनी शुक्रवारी (दि.१०) पदभार स्वीकारला . याअगोदर त्यांनी २०१८ पासून जवळपास साडे तीन वर्षे आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यांच्यानंतर आयुक्त म्हणून राजेश पाटील यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर दोन ते  तीन महिन्यातच बदली झाली. त्यानंतर  २०२२ मध्ये शेखर सिंग यांनी प्रशासकीय राजवटीमध्ये आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी प्रशासकीय राजवटीमध्ये अनेक  वादग्रस्त निर्णय घेतल्याचे आरोप राजकीय पक्षासह , सामाजिक संघटना, नागरिकांनी ही केले होते. अगोदर त्यांच्यावर एकनाथ शिंदे आणि नंतर देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त  असल्याची चर्चा शहरभर  होती. त्यामुळे ते भाजप धार्जिण कामांना प्राधान्य देत असल्याचे आरोप वारंवार केला जात होता. 

 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राज्यातील महायुतीमध्ये  सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर शहरातील पदाधिकारी तत्कालीन आयुक्त सिंग यांच्याकडे कामानिमित्त गेले असता त्यांना फक्त आश्वासने दिली जात होती. मात्र त्यांच्या कामाना प्राधान्य दिले जात नव्हते, तर दुसरीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या कामाना ग्रीन सिग्नल दिला जात असल्याचा  आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून वारंवार होऊ लागले होता .

शहरातील एकमेव आमदार आणि विद्यमान विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी विविध मागण्यांबाबत तत्कालीन आयुक्त सिंग यांना आदेश दिले होते. त्या कामांनाही त्यांनी स्थान न दिल्यामुळे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे त्याबाबत तक्रारी वाढल्या होत्या.  त्यानंतर अजित पवार यांनी शहरातील एका कार्यक्रमादरम्यान सिंग  यांची बदली होणार आहे असे वक्तव्य केले होते. सिंग यांच्या प्रशासकीय राजवटीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्र्रष्टचार झाल्याचे आरोप होत होते. त्याचा फटका येणाऱ्या निवडणुकीत बसू नये यासाठी नियमाने त्यांचे तीन वर्षापेक्षा जास्त  सर्व्हिस झाली होती, हे पाहून सिंग यांची नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी नियुक्ती करण्याचे आदेश राज्य शासन प्रशासनाने घेतला.

तत्कालीन आयुक्त सिंग यांच्या जागेवर कोण येणार? याबाबत माध्यमामध्ये विविध नावे चर्चली जात आहेत. मात्र सध्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहराच्या भौगोलिक, राजकीय, सामाजिक परिस्थितीची माहिती असलेले  मुद्रांक शुल्क आयुक्त पदाचा अनुभव घेऊन  त्यानंतर महामेट्रो व्यवस्थापकीय संचालक या पदावर कर्यरत असलेले  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कामानिमित्त उत्तम संबंध असणारे , शहरातील प्रश्नांची जाण असणारे , स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याबाबत माहिती असणारे श्रावण हर्डीकरांना पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार शुक्रवारी (दिनांक १०) स्वीकारला.

 त्यानंतर त्यांनी विविध विभागाच्या प्रमुखांची बैठक घेत शहरात सुरु असणाऱ्या कामाबाबत माहिती करून घेतली ; हे जरी खरे असले तरी,  महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अतिरिक्त पदभार स्वीकारणाऱ्या आयुक्त हर्डीकरांना शहरातील नागरिकांच्या, राजकीय पदाधिकारी, आणि प्रशासकीय राजवटीच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर महापालिका प्रशासनाला कोंडीत पकडण्यासाठी विविध पक्षांची आंदोलने, प्रश्नांचा भडीमार याला तोंड द्यावे लागणार आहे. तसेच राज्यात सत्ताधारी असणाऱ्या महायुतीतील घटक पक्षातील प्रमुख्य पदाधिकारी यांच्या सूचनांचे पालन करताना त्यांना तारवेरची कसरत करावी लागणार आहे हे कोणा ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही. त्यामुळे जोपर्यंत या पदावर आहेत तोपर्यंत त्यांना करदाते, राजकीय पक्ष आणि प्रशासन  या तिहेरी पातळीवर ताळमेळाची रस्सीखेच खेळावी लागणार आहे हे मात्र निश्चित. ते त्यामध्ये यशस्वी होणार की नाही? याकडे मात्र शहरवासीयांच्या नजर खिळल्या आहेत.