उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली अपघाती निधनाने पिंपरी-चिंचवडवर पसरली शोककळा
-पिंपरी-चिंचवड भाजप आमदारांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
लोकमान्य टाइम्स : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आजितदादा पवार यांचे बुधवारी (दिनांक २८) बारामती येथील विमानतळापासून काही अंतरावर विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. माझी जन्मभूमी बारामती असली तरी माझी कर्मभूमी ही पिंपरी-चिंचवड असल्याचे ते वारंवार मत व्यक्त करत होते. त्या औद्योगिकनगरीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जाण्याने शोककळा पसरली आहे. त्यांच्या अपघाती निधनानंतर भाजपच्या आमदारांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
———————–
पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे खरे ‘दादा’ हरपले : आमदार शंकर जगताप
आपली जन्मभूमी बारामती असली तरी माझी कर्मभूमी पिंपरी-चिंचवड आहे, असे निक्षून सांगणारे आणि पिंपरी-चिंचवड शहरावर पुत्रवत प्रेम करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली झालेले अपघाती निधन मनाला चटका लावून जाणारे आहे, अशी भावना आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे ते खरे ‘दादा’ होते असेही आमदार जगताप पुढे म्हणाले.
आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले, “अजित पवार हे केवळ ज्येष्ठ नेते नव्हते, तर चणाक्ष राजकारणी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि प्रशासकीय कारभाराचा दांडगा अनुभव असलेले कर्तबगार नेतृत्व होते. अशा व्यक्तिमत्त्वाचे आपल्या मधून जाणे हे केवळ पिंपरी-चिंचवडसाठी नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रासाठी मोठी पोकळी निर्माण करणारे आहे.”
१९९२ ते आजतगायत् सातत्याने या शहराबरोबर अजितदादांचा स्नेह जोडलेला होता. “पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीचे, प्रगतीचे आणि विकासाच्या वाटचालीचे ते खरे शिल्पकार होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आमचे वडीलबंधू दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत तब्बल तीस वर्षे शहरासाठी काम केले. शहराचा कायापालट करण्यासाठी झपाटून काम करणारी ही दोन व्यक्तिमत्त्वे होती. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी व्यथित करणारी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
आमदार जगताप पुढे म्हणाले, “अजित दादांसारखे धडाडीचे, निर्णयक्षम आणि झपाटून काम करणारे नेतृत्व पुन्हा तयार होण्यासाठी मोठा कालावधी लागतो. असा नेता पुन्हा होणे शक्य नाही . या शहरातील प्रत्येक कार्यकर्ता, नेता, पदाधिकारी यांचा अजित दादांशी स्नेह होता, ऋणानुबंध होते. राजकारणातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन काम करणारे ते व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही,” असेही त्यांनी भावुक शब्दांत सांगितले.
————————-
विकासाचा “दादा” माणूस हरपला ; बोले तसा चाले असे व्यक्तिमत्व असलेला नेता : आमदार अमित गोरखे
स्पष्टवक्तेपणा, ठाम निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेले नाते यामुळे अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले. अर्थमंत्रीपदाच्या काळात राज्याच्या विकासासाठी, महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण आणि युवकांसाठी राबवलेल्या योजनांचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.ते खऱ्या अर्थाने विकासाचे दादा होते..
या भावनिक संदेशात त्यांनी पवार कुटुंबीयांप्रती तसेच कार्यकर्त्यांप्रती संवेदना व्यक्त करत, “ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,” अशी प्रार्थनाही व्यक्त केली आहे.
———————-
अजितदादांसारखा धडाडीचा आणि कामाचा आवाका असणारा नेता पुन्हा होणे नाही : आमदार महेश लांडगे
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी (दिनांक २८)सकाळी झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आणि अतिशय धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
अजितदादांसारखा असा धडाडीचा आणि कामाचा आवाका असणारा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या जाण्यानं एक लोकाभिमुख व करारी नेतृत्व हरपलं आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी पहाटे सहा वाजेपासून तळमळीनं काम करणारे ते खरे लोकसेवक होते.
राज्याच्या जडणघडणीत त्यांनी दिलेलं योगदान हा महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवील. दादांचं अकाली जाणं हे त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो असा शोकसंदेश आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
——————————-

