बोऱ्हाडेवाडी- मोशीतील वाहतूक सक्षमीकरणासाठी नवा मार्ग
- आमदार महेश लांडगे दादा आपले आभारच ; फरांदे स्कीम पुढील रस्ता ही डांबरीकरण करा
- परिसरातील नागरिकांची मागणी
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली-मोशी शिवरस्त्यावरील वाढत्या वाहतुकीचा ताण अखेर कमी होणार आहे. भूमिपुत्र-जागामालक आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने या भागाला वाहतुकीचा पर्यायी मार्ग मिळाला आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या शिष्ठाईला यश आले आहे. गेल्या २८ वर्षांपासून प्रलंबित काम पूर्ण केले त्याबद्दल आपले आभारच ; मात्र फरांदे बिल्डर यांच्या समोरील रस्ता ही डांबरीकरण करावा अशी मागणी नागरिकांच्यातून करण्यात येत आहे.
चिखली, मोशी, बोऱ्हाडेवाडी परिसरात वाढती लोकसंख्या आणि रहदारीमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभभूमीवर वाहतूक सक्षमीकरणासाठी स्थायी उपाययोजना करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी पर्यायी रस्ते, डीपी रस्ते विकसित करण्यास प्राधान्य दिले जात आहे.
मोशी- बोऱ्हाडेवाडी येथील वुड्सविले फेज-वन, कुमार प्रिन्सविले, स्वराज सोसायटी या परिसरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम वेगाने सुरु झाले असून, या मार्गामुळे शिवरस्त्यावरील वाहतुकीचा बोजा लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहे.या रस्त्यासाठी लागणारी खासगी जागा सामाजिक भावनेतून बोराटे व बोऱ्हाडे कुटुंबीयांनी विनामोबदला हस्तांतरित केली. त्यासाठी शेतकरी मधुकर बोराटे, संतोष बोराटे, सुनील बोराटे आणि सिताराम बोराटे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यांच्या योगदानाबद्दल आमदार लांडगे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
शेतकरी, बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासन यांच्या तांत्रिक अडचणींमुळे जागा ताब्यात न आल्यामुळे प्रलंबित असलेले काही रस्ते आम्ही विकसित करण्यात यशस्वी झालो आहोत. याकामी शेतकरी, भूमिपुत्र आणि जागामालक तसेच बांधकाम व्यावसायिक यांच्यात समन्वय करुन समझोता करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामध्ये आमदार लांडगे यांना यश मिळाले आहे.
या प्रभागातील लोकप्रतिनिधी आणि माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेविका सारिका नितीन बोऱ्हाडे, तसेच निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे, नितीन बोऱ्हाडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर विकसित
भोसरी मतदार संघातील समाविष्ट गावांमध्ये २८ वर्षे प्रलंबित विकासकामांना आम्ही गती दिली. २०१४ पासून पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर आम्ही भर दिला. त्यामुळे चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर विकसित झाला आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहनांमुळे वाहतुकीवर ताण येत आहे. त्यामुळे विकास आराखड्यातील रस्ते विकसित करण्यास प्राधान्य दिले जात आहे. आगामी काळात वाहतूक कोंडीमुक्त पिंपरी-चिंचवड असा संकल्प आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वोतोपरी पुढाकार घेणार आहोत.
– आमदार महेश लांडगे, भोसरी
पूर्ण रस्ता होणार
या रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. आमदार महेशदादा लांडगे यांच्यामुळे भोसरी विधानसभेत मोठा विकास झाला आहे. मोशी मध्ये ही विकास कामाचे सर्व श्रेय आमदार दादांचेच आहे. हा रस्ता ही अनेक वर्षापासून प्रलंबित होता. शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करून येथील नागरिकांची मागणी पूर्ण करून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. फरांदे बिल्डर यांच्या समोर ही रस्त्यावर ब्लॉक बसविण्यात येतील. त्यानंतर दुसऱ्या टप्यात हा पूर्ण रस्ता करण्यात येईल.
– निखिल बोऱ्हाडे : युवा नेते, प्रभाग क्रमांक ०२

