अजितदादा पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित
गुरुवारी (दिनांक २९) होणार विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
लोकमान्य टाइम्स : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचं आज (दिनांक २८) रोजी दुःखद निधन झालं. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर त्यांचं पार्थिव बारामती मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं होतं. आता हे पार्थिव विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात ठेवण्यात येणार आहे. तसंच, उद्या (गुरुवार दिनांक २९) अंत्यसंस्कार होणार आहेत.
अजित पवारांचं पार्थिव आज सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनाकरता रात्री उशिरापर्यंत नागरिकांसाठी ठेवण्यात येणार आहे. तर, उद्या सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रा निघेल. गदिमा चौक, विद्यानगरी चौक, विद्याप्रतिष्ठानचा अंतर्गत रस्ता मराठी शाळेच्या गेटने विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर जाईल. तसंच, उद्या सकाळी ११ वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.

