बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा हरपला

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे  विमान अपघातात मृत्यू 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

महाराष्ट्राच्या राजकारणाला चटका  लावणारी घटना बुधवारी  (दिनांक २८ )  घडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचे बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले. ते बारामती येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी येत असताना हा दुर्दैवी अपघात झाला. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे महाराष्ट्रातील राजकारणातील दादा हारपल्याचा भावना महाराष्ट्रासह, देशातील राजकारणात उमटली आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान लँडिंगदरम्यान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर काही प्रवाशांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्यात आले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने राज्यभरातून शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी, विरोधी पक्षातील नेते तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व सहकारी संस्थांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अनेक नेत्यांनी त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, प्रशासकीय अनुभव आणि आर्थिक शिस्तीवर भर देणाऱ्या कार्यशैलीची आठवण काढली. 

अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. बी.कॉम. शिक्षण घेतलेल्या अजित पवार यांनी शेती व्यवसाय सांभाळत राजकारणात प्रवेश केला. ते लोकसभा सदस्य, सात वेळा विधानसभा सदस्य, विविध खात्यांचे मंत्री आणि अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिले. वित्त, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामीण विकास यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी प्रभावीपणे हाताळली. त्यांच्या कार्यकाळात पाणी व्यवस्थापन, ऊर्जा प्रकल्प आणि आर्थिक नियोजन यांना विशेष महत्त्व देण्यात आले. 

अजित पवार : राजकीय कारकीर्द

१. राजकारणात प्रवेश-

सहकार, शेती आणि ग्रामीण प्रश्नांमधून राजकारणात सक्रिय सहभाग

बारामती परिसरात संघटनात्मक कामातून नेतृत्वाची ओळख

लवकरच राज्य पातळीवरील प्रभावी नेता म्हणून उदय

२. लोकसभा कारकीर्द : 

लोकसभा सदस्य: जून १९९१ ते सप्टेंबर १९९१

सात वेळा विधानसभा सदस्य

  • १९९१ – १९९५
  • १९९५ – १९९९
  • १९९९ – २००४
  • २००४ – २००९
  • २००९ – सप्टेंबर २०१४
  • २०१४ – २६ सप्टेंबर २०१९
  • २०१९ – २०२४
  • २०२४-

३. राज्यमंत्री म्हणून कारकीर्द

  • कृषी व ऊर्जा राज्यमंत्री: जून १९९१ – नोव्हेंबर १९९२
  • पाणीपुरवठा, ऊर्जा व नियोजन राज्यमंत्री: नोव्हेंबर १९९२ – फेब्रुवारी १९९३

४. कॅबिनेट मंत्री म्हणून महत्त्वाची खाती

  • पाटबंधारे (कृष्णा खोरे व कोकण), फलोत्पादन मंत्री: ऑक्टोबर १९९९ – जुलै २००४
  • ग्रामीण विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे मंत्री: जुलै २००४ – नोव्हेंबर २००४
  • जलसंपदा व स्वच्छता मंत्री: नोव्हेंबर २००४ – नोव्हेंबर २००९
  • जलसंपदा व ऊर्जा मंत्री: नोव्हेंबर २००९ – नोव्हेंबर २०१०
  • राज्यातील धरणे, कालवे, सिंचन प्रकल्प, पाणी व्यवस्थापनात सक्रिय भूमिका

५. उपमुख्यमंत्री म्हणून दीर्घ अनुभव

  • नोव्हेंबर २०१० – सप्टेंबर २०१२
  • डिसेंबर २०१२ – सप्टेंबर २०१४
  • २३ नोव्हेंबर २०१९ – २६ नोव्हेंबर २०१९
  • ३० डिसेंबर २०१९ – २९ जून २०२२
  • २ जुलै २०२३ – २६ जानेवारी २०२४
  • डिसेंबर २०२४ – २८ जानेवारी २०२६

विरोधी पक्षनेते

  • ४ जुलै २०२२ – ३० जून २०२३

६. संस्थात्मक व सामाजिक भूमिका

  • बारामती विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त
  • वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे – सदस्य
  • रयत शिक्षण संस्था, सातारा – संचालक
  • पुणे जिल्हा शिक्षण मंडळ – अध्यक्ष (सप्टेंबर २००६ पासून)
  • महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन – मार्च २०१३ पासून
  • महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन – अध्यक्ष (ऑगस्ट २००६ – ऑगस्ट २०१८)
  • महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन – अध्यक्ष (सप्टेंबर २००५ – मार्च २०१३ व नोव्हेंबर २०१८ पासून)
  • महानंद व महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ – संचालक