आजचा दिवस काळाच्या पटलावरून पुसून टाकावा असं वाटतं
अजितदादा पवारांच्या आठवणीने भावुक झाले माजी आमदार विलास लांडे
लोकमान्य टाइम्स : प्रतिनिधी
मला आठवतं “जोपर्यंत माझे हात पाय हलतात, तोपर्यंत महाराष्ट्राचं भलंच करीन” असं अजितदादा एका सभेत बोलले होते. दिलेला हा शब्द.. “दादाचा वादा” त्यांनी अखेरपर्यंत पाळला. शेवटच्या श्वासापर्यंत अजितदादा महाराष्ट्राच्या हितासाठी सतत धावपळ करत राहिले.
त्यांची ही धावपळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी नेहमीच प्रेरणादायी होती. आजचा दिवस काळाच्या पटलावरून पुसून टाकावा असे मला वाटते अशी भावुक प्रतिक्रिया व्यक्त करीत अनेक वर्षे अजितदादा यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलास लांडे यांनी अजितदादा यांच्या अकाली अपघाती निधनानंतर भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबरच्या काही आठवणीतील छायाचित्रे माजी आमदार विलास लांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

माझ्या राजकीय, सामाजिक, वैयक्तिक जीवनात आदरणीय दादांनी नेहमीच मला बळ दिलं. संकट कोणतंही असो, अडचण काहीही असो, महाराष्ट्राचा “दादा माणूस” आपल्या पाठीशी आहे हा विश्वास कायम मनात असायचा. भोसरी विधानसभा मतदारसंघाचा पहिला आमदार म्हणून मला संधी देत अजितदादांनी माझ्यावर विश्वास दाखवला. पुणे व पिंपरी चिंचवड शहरांना आधुनिक रूप देत दादांनी दोन्ही शहरांच्या विकासाला गती दिली. भोसरी शहराच्या विकासासाठी त्यांनी व्यक्तिशः मला खूप मोठे पाठबळ दिले.
आज आदरणीय अजितदादा पवार आपल्याला सोडून अचानक गेले… त्यांचं जाणं हे माझ्यासाठी आभाळ कोसळण्यासारखं आहे. आयुष्यात यापुढे आपण काहीही साध्य करू, काहीही कमवू… पण दादांसारखा जिवंत मनाचा नेता पुन्हा साध्य करणे अशक्य असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

