पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रवी लांडगे बिनविरोध

  • दोन वेळा बिनविरोध नगरसेवक ; आता थेट बनले बिनविरोध महापौर 
  • महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच महापौरपद बिनविरोध

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी रवी बाबासाहेब लांडगे यांची निवड निश्चित झाली आहे. अधिकृत घोषणेची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. लांडगे यांनी महापालिकेत २०१७ आणि २०२६ असे दोन वेळा बिनविरोध नगरसेवक होण्याचा मान मिळविला असून त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी ही बिनविरोध होण्याचा इतिहास रचला आहे. मिळविला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका महापौरपदी भाजपच्या रवी लांडगे आणि उपमहापौरपदी विजय उर्फ शीतल शिंदे यांचे नाव निश्चित केल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्राद्वारे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना कळविले.  त्याअनुषंगाने सोमवारी (दिनांक ०२) दुपारी ३ ते ५ दरम्यान या पदासाठी अर्ज भरण्यात येणार होते. दरम्यान शीतल शिंदे हे ही महापौर पदासाठी इच्छुक होते. पण त्यांचे नाव पक्ष श्रेष्ठीनी उपमहापौर पदासाठी दिल्यामुळे ते नगरसेवकांच्या बैठकीतून नाराज होऊन उठून गेले. 

दरम्यान रवी लांडगे यांनी विधानसभेच्या तोंडावर उबाठा गटात प्रवेश केला होता. मात्र महानगरपालिका  निवडणुकीच्या तोंडावर भाजप मध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या महापालिका  निवडणुकीत रवी लांडगे यांनी २०१७ प्रमाणे २०२६ च्या निवडणुकीतही बिनविरोध होण्याची परंपरा अबाधित राखाली. २०१७ च्या पंचवार्षिक मध्ये रवी लांडगे यांना स्थायी समिती सदस्य करण्यात आले होते. त्यांना स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी दावा केला होता ; मात्र त्यांना फक्त सदस्य करण्यात आल्याने त्यांनी स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा देत नाराजी व्यक्त केली होती. 

२०२६ च्या निवडणुकीत बिनविरोध झाल्यानंतर रवी लांडगे यांना महापौरपद द्यावे अशी मागणी भोसरी विधानसभा मतदार संघातून होती. तसेच त्यांचे घराणे हे मुळ भाजप विचारधारेचे  असल्याने निष्ठावंत गटातून त्यांनाच संधी द्यावी अशी मागणी होती. त्यात भोसरीमध्ये झालेल्या गावकी-भावकी च्या बैठकीत आमदार महेश लांडगे यांनी रवी लांडगे यांच्या नावाला पसंदी दर्शविली. त्यामुळे रवी लांडगे यांचा महापौर होण्याचा  मार्ग मोकळा झाला.

  शीतल शिंदे नाराज झाल्यानंतर त्यांच्या जागी शर्मिला बाबर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने रवी लांडगे हे बिनविरोध महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सहा तारखेला अधिकृत महापौर म्हणून निवडीची घोषणा होईल. रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज भरताना  आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, गटनेते प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते. 

——————————-