बातम्या

सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्री करा 

अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली मागणी 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती विमानतळ जवळ बुधवारी (दिनांक २८) अपघाती निधन झाले. त्यांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर राज्यसभा सदस्य खासदार सुनेत्राताई अजितदादा पवार यांची नियुक्ती करावी, अशी मागणी महायुती सरकारकडे राज्याचे अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवारी(दिनांक २८) बारामती तालुक्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाहीर सभा होणार होत्या. त्यासाठी पहाटे मुंबईवरून खासगी विमानाने ते बारामतीकडे निघाले होते. दरम्यान सकाळी पावणे नऊ वाजता विमान चालकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही. विमान धावपट्टीच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेवर कोसळून झालेल्या अपघातात अजितदादा यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला.  

गुरुवारी (दिनांक २९) शासकीय इतमामात बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यासह देशातील विविध पक्षाच्या नेत्यांसह लाखोंचा जनसागर उपस्थित होता. राज्याच्या राजकारणात  ४० ते ४२ वर्षांमध्ये विविध क्षेत्रात अनुभव घेत कामाचा माणूस अशी ओळख निर्माण करण्यात अजितदादा कसे यशस्वी झाले होते हे त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित लाखोच्या जनसागरावरून दिसून येत होते. 

सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याची किमया त्यांनी केली होती. प्रशासनावर मजबूत पकड असणारा नेता, सर्वसामान्य जनतेचा नेता, तोंडावर स्पष्ट बोलणारा नेता, आपण स्पष्ट बोललो तर पुढील व्यक्तीला वाईट वाटेल याची परवा न करता खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणायची धमक ठेवणारा नेता, कार्यकर्त्याना, पदाधिकाऱ्यांना बळ देणारा नेता, सहकार, आर्थिक, क्रीडा क्षेत्रात मोठा अनुभव असणारा नेता, राज्याच्या कानकोपऱ्यातील माहिती असणारा नेता, जेवढा कडक तेवढा हळवा असणारा आणि आपल्या कामातून सर्वाना आपलेसे कारण नेता म्हणून अजितदादा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख निर्माण केली होती. 

माझी लाडकी बहीण योजनेला बळ देणारा राज्यकर्ता, काही झाले तरी ही योजना चालू राहिली पाहिजे यासाठी इतर विभागात कडक नियमाद्वारे काम करून लाडक्या बहीण योजनेला निधी कमी पडू नये याची तजवीज करणारा नेता, सर्वसामन्यात मिसळून त्यांची कामे करणारा नेता अशी ओळख निर्माण करणाऱ्या नेतृत्वाचे अपघाती मृत्यू होणे हे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या मनाला चटका लावून गेले आहे. 

त्यांच्या जाण्याने जसा महाराष्ट्र पोरका झाला आहे तसा त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही पोरका झाला आहे. अजितदादा यांच्यावर विश्वास ठेवून अनेक नेत्यांनी त्यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याच्या हालचाली वाढल्या होत्या. त्यानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ही हे दोन्हीही पक्ष एकत्रित होण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन निवडणूक लढवीत होते. 

दरम्यान अजितदादा यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे त्यांच्या जागेवर कोण उपमुख्यमंत्री होणार, दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित होणार का? ते एकत्रित झाले तर सरकारमध्ये सर्वजण सामील होणार का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख खा. शरद पवार आपली विचारधारा बदलून भाजपबरोबर जाणार का? का एप्रिल मध्ये त्यांच्या राज्य सभेची मुदत संपत असल्याने ते राजकारणातून निवृत्ती घेऊन पुढील पिढीला मार्गदर्शन करणार? या प्रश्नासह आजितदादा यांची जागा कोण घेणार? त्यासाठी पक्षातील काही नेत्यांच्या नावावर चर्चा सुरु असतानाच  राज्याचे अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यसभा सदस्य सुनेत्राताई अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे. या नावाला महायुतीसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हिरवा कंदील मिळेल अशी चर्चा सुरु आहे.