कोल्हापूरपिंपरी चिंचवड

हॅमर थ्रो राष्ट्रीय स्पर्धेत विश्वजीत गावडेला सुवर्ण 

  • महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांना नातवाने दिली वाढदिवसानिमित्त  सुवर्णपदाकाची भेट 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

हैद्राबाद येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय शाळा क्रीडा संघटना यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत चिंचवड येथील विश्वजीत विशाल गावडे याने सुवर्ण पदकाला गवासणी घातली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांचा तो नातू असून आजोबांना त्यांच्या  वाढदिवसानिमित्त सुवर्णपदकाची भेट दिल्याच्या प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवड शहरात उमटल्या आहेत.

या स्पर्धा २९ ऑक्टोबर रोजी गच्चीबोली स्टेडिअम येथे पार पडल्या. विश्वजीत १८ वर्षाखालील गटात सहभागी झाला होता. त्याला स्कूलच्या प्रिन्सिपल सुश्मिता मोहंती तसेच हॅमर थ्रो राष्ट्रीय कोच सौरभ शहा यांचे मार्गदर्शन लाभले. भारतातील सर्व राज्यातील मिळून ५२ खेळाडू सहभागी झाले होते. ६ व्या फेरीत ३५ मीटर हॅमर फेकून त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

विश्वजीत हा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष जेष्ठ नेते हनुमंतभाऊ गावडे यांचा नातू, भारत केसरी पैलवान विजय गावडे यांचा पुतण्या तर विशाल गावडे यांचा मुलगा आहे. त्याच्या या यशामुळे पिंपरी -चिंचवडमध्ये शहरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  याबाबत बोलताना राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष हनुमंत गावडे म्हणाले की, विश्वजीत ने या खेळात सातत्य ठेवावे, उत्तम सराव करावा आणि शालेय जीवनाबरोबर एक दिवस देशासाठी सुवर्ण पदक मिळविण्याचे ध्येय ठेवून त्यादृष्टीने त्याने त्यात अपार कष्ट करावे. त्याच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.