पराभवाचे खापर मात्र बनसोडे, लांडे आणि गव्हाणे यांच्यावर
दादांनी ताकद दिली ते शहरातील नेते गप्प बसले
राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला आरोप
लोकमान्य टाइम्स ; संजय शिंदे
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला मात दिली. १२८पैकी ८४ जागा जिंकत महापालिकेवर दुसऱ्यांदा एकहाती कमळ फुलविले. राष्ट्रवादी काँग्रेसला ३७ जगावर समाधान मानावे लागले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भाजपला भ्रष्टाचाराच्या कटघऱ्यात उभे करून अनेक आरोप करून एकाकी निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला. त्याला अजितदादानी मोठे केलेले विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांनी साथ न देता ते गप्प बसले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यावेळी केला ; तर आम्हीही त्यामध्ये कमी पडलो असे वक्तव्य त्यांनी केले.
एकीकडे शहरात भाजपचे चार आमदार आहेत. त्यांची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे ; तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी होत आहे. पक्षाची ताकद वाढवायची असेल तर पक्षातील पदाधिकाऱ्याला विधान परिषद, महामंडळाची पदे देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत, अप्रत्यक्षरित्या विधान परिषद द्यावी आणि ती आपणास द्यावी असे अप्रत्यक्षरीत्या सुचविण्याचा प्रयत्न बहल करताना दिसत आहेत. —————-
पिंपरी-चिंचवड सार्वत्रिक महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात सत्तेत एकत्रित असणाऱ्या महायुतीतील घटक पक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे एकमेकांच्या विरोधात सामोरे उभे ठाकले होते. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच आरोप-प्रत्यारोपामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी असणाऱ्या भाजप कारभारासह आणि त्यानंतर प्रशासकीय राजवट भाजप आमदारांच्या नियंत्रणाखाली सुरु असल्याची जहरी टीका केली. त्याबाबत मी कोणते ही पुरावे असल्याशिवाय आरोप करीत नाही असे जाहीर केले होते.———————
त्याला भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी ही तोडीस तोड उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टचार आरोपावर स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर असा नारा दिला. विरोधक करीत असलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. आम्ही विकास कामाला प्राधान्य दिले. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आरोप खोटे आहेत हे मतदारच पुन्हा आम्हाला मतदान करून विरोधकांना मतदानातून उत्तर देतील असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी आपल्या प्रचाराचा मुद्दा केला. आणि पार पडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये शहरवासीयांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास व्यक्त करीत ८४ जागेवर कमळ चिन्हाला विजय मिळवून दिला.——————
तर राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड मध्ये सत्तेपर्यंत निश्चित पोहचेल असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. मात्र हे अंदाज शहरवासीयांनी पुन्हा एकदा फोल ठरविले. राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त ३७ जगावर समाधान मानावे लागले. ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या कारभारावर आरोप केले होते, त्याला शहरातील स्थानिक नेत्यांनी साथ दिली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला त्यामध्ये अपयश आल्याचे मत शहराध्यक्ष योगेश बहल यांनी खासगी चँनेल ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे यांनी प्रभाग क्रमांक ०९ मध्ये मुलाला उमेदवारी दिली. त्यामुळे ते तेथेच अडकून पडले. —————-
त्यांनी मुलाबरोबर इतर प्रभागात ही लक्ष देणे आवश्यक होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. तर त्यांचा हक्काचा असणारा प्रभाग क्रमांक १० मध्ये ही दुर्लक्ष केल्याचा आरोप बहल यांनी यावेळी केला. तर प्रभाग क्रमांक १९ मध्ये आमदार बनसोडे यांनी पक्षाच्या नव्हे तर अपक्ष उमेदवारांना ताकद दिल्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर बहल यांनी मी ही माझ्या निवडणुकीत व्यस्त असल्याने मला तेथे काय झाले हे माहित नाही असे घुमजाव केले तरी तेथे अपक्ष उमेदवारांना मात्र प्रचंड मते मिळाल्यामुळे पक्षाच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागल्याचे स्पष्ट करीत तेथील प्रभागातील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेला बळ दिल्याचे दिसत आहे. ——————-
तर पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस प्रचार प्रमुख असणाऱ्या माजी आमदार विलास लांडे यांनी मुलाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून महापालिका निवडणुकीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. तर अजित गव्हाणे यांचे त्यांच्या प्रभागापुरते काम होते. तेथे त्यांनी प्रभाग सोडून दिला असा आरोप केला. तर अजित दादा यांनी ज्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप केला होता, तो मुद्दा उचलण्यात आम्ही सर्वजण कमी पडलो असे मते बहल यांनी यावेळी व्यक्त केले. तर विठ्ठल उर्फ नाना काटे आणि मोरेश्वर भोंडवे हे एक घरातील दोन उमेदवारी नको असे आम्ही सर्वानी सांगून ही अति आत्मविश्वास त्यांना नडल्यामुळे तेथे त्यांना म्हणावे तेवढे यश मिळाले नाही.
———————-
त्या उलट भाजप कडून त्यांच्या उमेदवारांना सर्व ताकद दिली. मनी, मसल पॉवर, मॉरल सपोर्ट दिला , यांच्याकडे चार आमदार आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांची मोठी टीम मदतीला होती. त्या उलट राष्ट्रवादी काँग्रेसकडे या निवडणुकीत फक्त आजितदादा यांनी भाजपने त्यांच्या महापालिका सत्ता काळात आणि त्यानंतर प्रशासकीय राजवटी मध्ये प्रशासनाला हाताशी धरून केलेल्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळात केलेला विकास यावर भाष्य केले. मात्र आजितदादा यांना शहरातील आजी -माजी आमदार यांच्याकडून साथ मिळणे अपेक्षित होते तसे न होता त्याच्या आडवे पुत्रप्रेम आल्याने ते शांत राहिल्याने व आम्हा सर्वांकडून ही हवी तेवढी मदत न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेच्या जवळ जाता आले नाही ही सल बहल यांनी बोलून दाखविली.——————-

