निवडणूक प्रमुख म्हणून आमदार शंकर जगताप उपमुख्यमंत्री अजित पवारांना अंगावर घेणार का ?
- अजित पवारांना अंगावर घेणारे आमदार महेश लांडगे यांच्यावर उत्तर पुण्याची जबाबदारी
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रमुखपदी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांची तर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांना अंगावर घेण्याची हिंमत ठेवणारे भोसरीचे आमदार महेश लांडगेंच्यावर उत्तर पुणे (मावळ ) चे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसाठी आमदार जगताप पवारांना अंगावर घेणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
२०१७ मध्ये अजित पवारांची २५ वर्षाची सत्ता नेस्तनाबूत करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले आमदार महेश लांडगेंना बरोबर घेत ७७ नगरसेवक कमळ चिन्हावर निवडून आण्यात दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगतापांना यश आले होते. तर २०२२ च्या निवडणुकीत ‘अब की बार सौ पार ‘ असा नाराही दिला होता. दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांनतर लक्ष्मणभाऊ यांचे ‘ बॅकबोन ‘ अशी ओळख असणारे शंकर जगताप यांनी २०२४ च्या चिंचवड विधानसभा निवडणुकीत यश संपादन केले. त्या जगतापांच्यावर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रमुख पदाबाबत दाखविलेला विश्वास ते सार्थ करणार का ? याकडे सर्व राजकीय पक्षासह पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंच्यायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. न्यायालयाच्या आदेशाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्वच रखडलेल्या निवडणुका घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यादृष्टीने राज्यात सत्तेत एकत्रित असणाऱ्या महायुतीमधील मित्र पक्षानी मुंबई वगळता इतरठिकाणी निवडणूक स्वत्रंत लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजप विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच सरळ लढत होणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्षानी तयारी सुरु केली आहे. त्यांच्यासह महाविकास आघाडी मित्र पक्ष आणि नव्याने त्यांच्या समवेत निवडणूक लढण्याच्या तयारीत असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार ही त्यांना ऐन वेळेवर तगडी लढत देऊ शकतात अशी चर्चा शहराच्या राजकारणात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होणार असल्याचे निश्चित आहे. तर भाजपला रोखण्यासाठी ऐनवेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी व मित्र पक्ष ही एकत्रित येऊ शकतात ? अशी ही चर्चा आहे. शहर भाजपकाडे दोन विधानसभा आणि दोन विधान परिषदेचे असे एकूण चार आमदार, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मोठे संघटन यांचे मोठे पाठबळ आहे. भाजप पुन्हा २०१७ ची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाले आहे.पुणे जिल्ह्यात भाजप पक्ष एक नंबरवर राहण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे आग्रही आहेत. त्यामुळे जबाबदारी कोणती ही कोणाकडे असली तरी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकासह पुणे दक्षिण आणि उत्तर मध्ये ही जास्तीत जास्त भाजपचे उमेदवार निवडून आण्याची जबाबदारी केंद्रीय सहकार आणि हवाई उड्डाण राज्यमंत्री मुलीधर मोहोळ(निवडणूक प्रभारी ) यांच्या नेतृत्वाखाली सर्वाना दिली असल्याने आमदार जगताप पिंपरी-चिंचवड चा गड राखण्यात यशस्वी होतात का याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.
पुन्हा भाजप च बाजी मारणार
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये भाजप हाच एक नंबरचा पक्ष राहणार आहे. आम्ही यावर्षी शंभर च्या वर जागा जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, उत्तर पुणे निवडणुक प्रमुख आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे व पिंपरी चिंचवड शहर व जिल्हा कार्यकारिणी, पदाधिकारी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ यांचे अब की बार सौ पार हे स्वप्न पूर्ण करणार असा आम्हाला विश्वास आहे.
- शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष पिं. चिं. शहर व जिल्हा

