बातम्यामहाराष्ट्रराजकीय

त्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली ; शिंदे गटाच्या नेत्याचा अजित पवारांच्यावर निशाणा

  • शिवसेना नेते रामदास कदमांची अजित पवारांच्यावर डागली तोफ
  • गेल्यावेळी ही त्यांच्यामुळेच शिवसेनेला मंत्रीपदे कमी
  • महायुती भक्कमच राहणार असल्याचा विश्वास
  • वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत रामदास कदमांचा अजित पवारांच्यावर निशाणा

लोकमान्य टाइम्स : ऑनलाईन

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून महाराष्ट्रात महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. सत्ता स्थापन होई पर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. २०२४ ची महायुतीची विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. महायुतीच्या २३४ जागा निवडून आल्या आहेत. त्याअनुषंगाने एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे असा आग्रह धरण्यात आला होता. मात्र देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे. त्यात अजित पवार व त्यांच्या समर्थक ४१ आमदारांनी फडणवीस यांचं पाठिंबा दिल्याने शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला असून त्यांच्या पाठिंब्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी केली आहे.

शिवसेनेचे नेते प्रसारमाध्यमांसमोर येऊन एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावे अशा प्रतिक्रिया देत होते. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेतेही आपापल्या नेत्यांना मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून मागणी करत होते. पण अखेर भाजप केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रीपद भाजपाकडेच राहिल, असे स्पष्ट संकेत दिले. त्यानंतर आता शिंदे गटाकडून अजित पवार यांना लक्ष्य केले जात आहे.

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी झी २४ तास वृत्तवाहिनीशी बोलत असताना अजित पवार यांच्यावर टीका केली. याआधी जेव्हा २०२३ साली अजित पवारांना सत्तेत सामील करून घेतले होते, तेव्हाही आमच्या लोकांना मंत्रिपद मिळाले नाही, असे म्हणत कदम यांनी अजित पवारांवर टीका केली होती.

रामदास कदम म्हणाले, भाजपाच्या लोकांना देवेंद्र फडणवीस आणि आमच्या कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते. अजित पवार हे तर शरण गेले असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला आहे. त्यांच्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर त्यांनी संपवली, हा भाग वेगळा. अजित पवारांमुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळण्यात अडचण येणार असल्याचे रामदास कदम यांच्या वक्तव्यातून प्रतीत होत आहे. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्रीपदावरून कुणी, कितीही, काहीही प्रयत्न केले तरी आमची महायुती अभेद्य राहणार आहे.

“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून लढाई लढली आणि मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिलं. आता झुकते माप कुठे टाकायचे, हे पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे”, असेही रामदास कदम म्हणाले.

२०२२ साली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेऊन ४० हून अधिक आमदारांसह भाजपाशी हातमिळवणी केली. स्पष्ट बहुमत असतानाही भाजपाने २०२३ साली अजित पवारांनाही सत्तेत सामील करून घेतले. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची पंचाईत झाली. आताही विधानसभेच्या निकालानंतर भाजपाकडे १३२ अधिक पाच अपक्ष आमदार असे १३७ चे संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) ४१ यापैकी कुणाचीही साथ घेतली तरी सरकार चालवणे सोपे होणार आहे. याची जाणीव महायुतीमधील सर्वच पक्षांना आहे.