पिंपरी चिंचवड

भाऊसाहेब भोईर  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपला अंगावर घेणार का? 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस महानगरपालिकेच्या गटनेतेपदी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली आहे. तसे  पत्र  विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सादर केले आहे. गटनेता हाच विरोधी पक्षनेता असणार आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

हे जरी खरे असले तरी दिवंगत उपमुख्यमंत्री आजितदादा पवार यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित नगरसेवकांना कामा संदर्भात जो कानमंत्र दिला होता ; त्यानुसार भाजपच्या चुकीच्या कामाना राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करणार का? भाऊसाहेब भोईर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपला अंगावर घेणार का? याकडे शहरवासियांच्या  नजरा असणार आहे

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुतीतील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्रित निवडणुकीला सामोरे गेले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत महापालिकेच्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर आरोप – प्रत्यरोप केल्यामुळे राज्यात ही निवडणूक गाजली होत

त्यामध्ये भाजप आर पी आय आठवले गट युतीने बाजी मारली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता दुसऱ्यांदा आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले. भाजपने १२८ पैकी  ८४ जागेवर विजय मिळविला. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३७ जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने ०६ तर ०१ जागेवर अपक्षाने विजय मिळविला.

महानगरपालिका निवडणुकीनंतर  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवक यांची पुण्यात  दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांसह  स्थानिक पदाधिकारी, नेत्यांना कामाबाबत मार्गदर्शन आणि कानपिचक्क्या दिल्या होत्या. 

आपण  राज्यात महायुतीत असलो तरी, स्थानिक स्तरावर  भाजपने चुकीची कामे केली तर त्याला विरोध करा, शहरवासियांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला दिला होता. आता तेच नगरसेवक, पदाधिकारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेला सल्ला पाळतात? की भाजप च्या एकहाती सत्तेसमोर  बघ्याची भूमिका घेतात याकडे शहरवासियांचे लक्ष असणार आहे ;  हे कोणा ज्योतिष्याला विचारण्याची गरज नाही. 

————————————