महाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी स्वीकारला अधिकृत पदभार

  • दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही 
  • महाराष्ट्राला अधिक सक्षम घडविण्याचा करणार प्रयत्न 
  • जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आजितदादा पवार यांनी  मंगळवारी (दिनांक १०) अधिकृतपणे पदभार स्वीकारला. 

पदभार स्वीकारताच सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (x) हॅन्डलवर ट्विट करीत अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि  महाराष्ट्र अधिक सक्षम  घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी  व्यक्त केला. राज्याच्या जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

 शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे हीच आपली प्राथमिकता असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. विकासाभिमुख निर्णय आणि लोकाभिमुख प्रशासन हाच आपला मार्ग असेल, असंही त्यांनी ट्विटमधून नमूद केलं आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर त्या आज पहिल्यांदाच कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार असून, राज्याच्या विकासकामांना गती देणे आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.

दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल असे महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास दिला आहे.