पिंपरी चिंचवड

स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग


पिंपरी-चिंचवड भाजपात राजकीय लॉबिंगला वेग
-अडीच-अडीच वर्षाचा फार्मुला ; पाच वर्षात १४ जणांना मिळणार संधी
-पराभूत उमेदवारांचा स्वीकृतमधून पत्ता कट ; पक्ष संघटनेत मिळणार संधी

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने ८४ जागेवर विजय प्राप्त केला. या संख्येच्या जोरावर  १० पैकी  ०७ जगावर त्यांना स्वीकृत नगरसेवक पदे वाट्याला आली आहेत. त्यांची निवड मार्च महिन्यात करण्यात येणार आहे.  महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारीवर हक्क असताना तो पक्ष हितासाठी सोडणाऱ्या कर्यकर्त्यांबरोबर पक्ष वाढीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी  स्वीकृत नगरसेवक पदासाठी  गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यासाठी शहर स्तरावर जोरदार लॉबिंग सुरु झाले आहे. एकूण ०७ जगामध्ये भोसरी,चिंचवड विधानसभेला  प्रत्येकी ०३ आणि पिंपरीसाठी ०१ जागा अशी वाटणी झाल्याचीही चर्चा आहे.

इच्छुकांची संख्या मोठी असल्याने पाच वर्षे संधी देण्यापेक्षा त्याचा कार्यकाळ अडीच-अडीच वर्षे करून ०७ ऐवजी १४ जणांना संधी देण्याचा फॉर्मुला ठरल्याचे सुतावेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले.  ज्यांना महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाला अशा कर्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पदावर संधी देऊ नये हा ही धक्कादायक निर्णय घेण्यात आल्याचे समजते ; हे जरी खरे असले तरी हा निर्णय म्हणजे  ‘ खायचे दात वेगळे आणि दाखवावयाचे दात वेगळे’ असा ठरू नये अशी   चर्चा भाजपच्या कर्यकर्त्यामध्ये खासगीमध्ये आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भाजपने आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली. या निवडणुकीकडे पूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या लढाईत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसवर मात करीत सलग दुसऱ्यांदा महानगरपालिकेवर कमळ फुलविण्याचे किमया केली.

१२८ जागेपैकी ८४ जागा भाजपने तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३७ जागा जिंकल्या.  २०१७ च्या निवडणुकीनंतर एकूण ०७  स्वीकृत नगरसेवक होते. त्यामध्ये भाजपकडे ०५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे ०२ नगरसेवक  अशी विभागणी करण्यात आली होती ; २०२६ च्या निवडणुकीनंतर ती  ०७ वरून  १० करण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपला ०७ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ०३  सदस्य  आले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीनंतर महापौरपदी दोन वेळा बिनविरोध नगरसेवक  रवी बाबासाहेब लांडगे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी विश्वास व्यक्त करीत काम करण्याची संधी दिली आहे. सत्तारूढ पक्षनेतेपदी प्रशांत शितोळे, उपमहापौरपदी शर्मिला बाबर  यांची निवड करण्यात आली आहे. शहराचे लक्ष आता महानगरपालिकेच्या आर्थिक चाव्या कोण्याच्या हातात जाणार याबरोबरच  स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिन्ही विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे काही दिग्ज पदाधिकाऱ्याना पराभवाचा सामना करावा लागला.

त्यापैकी अनेकांनी आपले राजकीय अनुभव पणाला लावून किमान आता स्वीकृत नगरसेवक पद पदरात पडून घेण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु केली आहे ; मात्र, त्यांच्या या महत्वकांक्षेला पक्षातून सुरुंग लागणार हे निश्चित झाले आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्यांना  महानगरपालिका निवडणुकीत पराभव स्वीकाराव लागला, त्यांना पुन्हा स्वीकृत नगरसेवक पदावर संधी देण्यात येणार नसल्याचे पुण्यात जाहीर केले  आहे. या निर्णयामुळे  स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  

प्रदेश स्तरावरून जो निर्णय होईल त्यांचे पालन करणार  
स्वीकृत नगरसेवक पद निवडीबाबत ०७ जणांना पाच वर्षे संधी देण्याऐवजी त्याचा कार्यकाळ कमी करून अडीच-अडीच वर्षे असा फार्मुला ठरलं आहे. त्याबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांनी सुतावेच केले आहेत. त्यामुळे  ०७ ऐवजी  १४ कार्यकर्त्यांना नगरसेवक पदाची  संधी मिळणार आहे. तसेच जे निवडणुकीत पराभूत झाले आहेत त्यांना स्वीकृतवर संधी मिळणार नाही. त्यांना दादा जसे म्हणाले  तसे पक्ष संघटनेत काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय प्रदेशात होऊन आजच तसे आदेश आम्हाला मिळतील. त्यानुसार जसे आदेश मिळतील त्यानुसार ते निर्णय आम्ही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत लागू करणार आहे.
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष , पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हा