महाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर ठरणार विधान परिषद निवडणुकीचे भवितव्य  

  • विधान परिषद निवडणूक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता
  • राष्ट्रवादी काँग्रेसकडे अतिरिक्त १३ मते 
  • महाविकास आघाडीला ०१ जागा


लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे 

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपुष्टात येणार आहे. त्याअनुषंगाने  विधान परिषदेच्या ९ जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

 विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला ५, शिवसेना २, राष्ट्रवादी १ अशा मिळून महायुतीच्या वाट्याला ०९ पैकी ०८ आणि महाविकास आघाडीच्या वाटणीला १ जागा येण्याची शक्यता आहे ; परंतु,  राष्ट्रवादीकडे असणाऱ्या अतिरिक्त १३ मताच्या जोरावर  महायुतीने आणखी एक उमेदवार देण्याचे ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळू शकते. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जावे लागणार की ती बिनविरोध होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुदत संपणारे आमदार

उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा)नीलम गोऱ्हे (शिवसेना)शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)गोपीचंद पडळकर (भाजप)रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)राजेश राठोड (काँग्रेस)प्रवीण दटके (भाजप)रमेश कराड (भाजप) या आमदारांची १३ मे ला मुदत संपणार आहे. 

एक आमदार निवडूण येण्यासाठी २८ मतांचा कोटा 

 विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (१३१ आमदार), एकनाथ शिंदे  यांची शिवसेना (५७ आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (४० आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे ८ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना १० मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.

…..त्या १७ जागांचीही मार्ग मोकळा 

अडीच वर्षापासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या १७ जागांचीही निवडणूक लवकरच होणार असल्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याने विधान परिषदेच्या १७ जागा भरण्यासाठी हालचाली सुरू आहे. १७ मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भातला अहवाल लवकर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार असल्याची मिळत आहे. २० जिल्हा परिषदाची निवडणूक बाकी असली तरी परिषदेच्या १७ जागांची निवडणूक घेण्यास कोणतीही अडचण नसल्याची सूत्रांची माहिती आहे.