पिंपरी चिंचवड

आयुक्तांचा जावई शोध; पिंपरी-चिंचवडला जगात कोणच ओळखत नाही

  • गांधर्व मंच संगीत स्पर्धेच्या पत्रकार परिषदेत आयुक्त विजय सूर्यवंशी चे खळबळजनक वक्तव्य 

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे    

संगीताचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाला जगात ओळखतात; परंतु, पिंपरी-चिंचवडला जगात कोणी ही ओळखत नसल्याचे खळबळजनक वक्तव्य  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शहरात  नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. औद्योगिकनगरी, आय टी हब अशी जगाच्या नकाशावर ओळख निर्माण करणाऱ्या शहराबाबत आयुक्तांनी हा जावई शोध लावल्याने शहरातील विविध क्षेत्रातून नाराजीचा सूर उमटला आहे.    


 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचालित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल ते जूनमध्ये आयोजित केलेल्या गांधर्व मंच संगीत स्पर्धेची माहिती देण्यासाठी आयुक्तांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. आयुक्तांच्या वक्त्यव्यावर उपस्थित पत्रकारांनी तात्काळ आक्षेप घेतलं.  या विधानामुळे शहराच्या जागतिक स्तरावरील ओळखीबाबत प्रश्नचिन्ह उभा करण्याचा प्रयत्न केला गेल्याच्या संतप्त  प्रतिक्रिया औद्योगिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातून उमटू लागल्या आहेत.

शहराची ओळख जगाला करुन देण्याची गरज नाही

पिंपरी-चिंचवड हे केवळ नकाशावरच शहर नाही, तर ते लाखो हातांना काम देणारी उद्योगगरी आहे. संत ज्ञानेश्वर माऊली , संत तुकाराम महाराज, संत मोरया गोसावींच्या पदस्पर्शाने पावन झालेली,  भक्तीच्या मांदियाळीने फुललेली आणि क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाने घडलेली ही भूमी आहे.  पिंपरी-चिंचवड शहर कामगारांच्या घामाने व कष्टाने देशाला आर्थिक गती दिली. त्या शहराची ओळख जगाला करून देण्याची गरज नाही. त्याच अस्तित्वच त्याची सर्वात मोठी ओळख आहे.

सीमा सावळे : माजी अध्यक्षा स्थायी समिती

____________________________________________

…..त्यानंतर शहराच्या ओळखीचे प्रमाणपत्र द्यावे

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अगोदर पिंपरी-चिंचवड शहराचा इतिहास समजून घ्यावा. त्याबाबतचा अभ्यास करावा.  त्यानंतर शहरच्या ओळखीचे प्रमाणपत्र द्यावे. जगाच्या नकाशावर शहराची ओळख ही औद्योगिकनगरी म्हणून आहे, हे कोणा ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही. शहराची ओळख हा आम्हा ३० लाख शहरवासीयांच्या अभिमान आहे.  औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाबाबत परिपूर्ण माहिती घ्या, त्याचा अभ्यास करा , मग आपण शहराची ओळख नेमकी काय आहे ? याबाबत वक्तव्य करा.  तुम्ही जे वक्तव्य केले आहे त्यापेक्षा जग काय म्हणते याला आम्ही महत्व देतो. त्यामुळे आपण पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीक अभ्यास करावा, म्हणजे पिंपरी-चिंचवड ची जगात काय ओळख आहे, हे आपणास समजेल

हनमंत लांडगे : संघटन सरचिटणीस कामगार आघाडी, प्रदेश भाजप

__________________