अहो दादा अकरा महिने झाले ; कार्यकारिणीचे घोडं आडलंय कोठे
- निवडणुकीला सामोरे जाणार आहात ; टीमचा पत्ताच नाही
- कार्यकर्ते तगडे ; मात्र समन्वयचा अभाव
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
शहर कार्यकारिणीत काम करण्यासाठी १८४ कार्यकर्ते इच्छुक आहेत ; शहरध्यक्षांची निवड होऊन अकरा (ऑक्टोबर २०२४) महिने उलटले, तरी ही पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी निवडीला शहराध्यक्ष योगेश बहल यांना वेळ मिळेना. त्यामुळे अहो दादा अकरा महिने झाले ; कार्यकारिणीचे घोडं आडलंय कोठे अशी म्हणण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस च्या इच्छुक कार्यकर्त्यावर आल्याचे पाहावयास मिळत आहे. एकीकडे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इतर राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली असताना राष्ट्रवादी काँग्रेस मात्र कार्यकारिणीतच गुरफटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
नागपूर शिबिरात मुंबई वगळता इतर सर्व ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा प्रफूल पटेल यांनी केली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. जिथे भाजपाची सत्ता आहे त्याठिकाणी ते महायुतीतील इतर घटक पक्षाशी जागांच्या बाबतीत तडजोड करण्यासाठी कसल्या ही प्रकारे तयार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये एकूण १२८ पैकी २०१७ च्या निवडणुकीमध्ये एक पुरुस्कृत उमेदवारासह ७८ जागेवर भाजप ने यश संपादन केले होते. तसेच पाच अपक्ष नगरसेवक यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस (एकसंघ ) ३६ जागेवर विजय मिळविला होता.
अजित पवारांची राष्ट्रवादी भक्कम
सध्यस्थीतीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन पक्ष निर्माण झाले आहेत. तरीही बहुतांशी माजी नगरसेवक आणि पदाधिकारी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरेदखल झाले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच माजी नगरसेवक व पदाधिकारी असल्याने सद्यस्थितीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी ची पक्कड मजबूत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष ना अण्णा बनसोडे यांच्यासह माजी आमदार विलास लांडे, शहरध्यक्ष योगेश बहल, अजित गव्हाणे, नाना काटे यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मोठे संघटन आहे.
सांघिक प्रयत्नांची गरज
मात्र या संघटनामध्ये एकसुसूत्रता नसल्याने शहरात २०१७ महापालिका निवडणुकीच्या अगोदर जवळपास २५ वर्षे शहरावर एकहाती सत्ता असताना ही पक्षाची वाताहात झाली. ती पुढे होऊन द्यायची नसेल तर संघटना मजबूत करणे आवश्यक आहे. त्यासाठी शहर कार्यकारिणी त्वरित जाहीर करून त्यामध्यमातून पक्षाची ध्येयधोराणे तळागाळापर्यंत पोहचवीणे आवश्यक आहे. शहर स्तरावरील कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अवलंबून न राहता ती शहर पातळीवर सोडविण्याचा सांघिक प्रयत्न झाला पाहिजे. मात्र तसे होत नसल्याने शहरवासीय आपल्या समस्या सोडविण्यासाठी इतर पक्षाचा सहारा घेत आहेत.
स्वप्न सत्यात उतरवतील का?
महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यांदृष्टीने सर्वांनी प्रयत्न सुरु केले आहेत. पिंपरी चिंचवड शहरात महायुतीमध्ये घटक पक्ष असणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षातच खरी स्पर्धा पाहवयस मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यांदृष्टीने भाजपने अब की बार १०० पार हा नारा दिला आहे. त्यांदृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. सद्यस्थितीला महापालिका निवडणुकीची तयारी पाहता भाजप पक्षाने जोरदार तयारी केली आहे. चार ही आमदार यांनी आपले गड राखण्यासाठी जबाबदारी घेतली असताना त्यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मात्र अजून कार्यकारिणी निवडीमध्येच गुरफटल्याचे दिसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा जनसंवाद च्या माध्यमातून शहरातील समस्यांचे निराकरण करतील ही, पण शहरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते हे मनाने एकत्रित येऊन दादा चे स्वप्न सत्यात उतरवतील का? हा मात्र संशोधनाचा विषय आहे.

