पिंपरी चिंचवडपुणेराजकीय

बैठक अजितदादा पवारांची ; चर्चा मात्र विलास लांडे यांची

  • मा. आमदार विलास लांडे अजितदादा पवार यांच्यासोबत
  • आमदार अण्णा बनसोडे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित
  • अजितदादा गटातून शरद पवार गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांचा लांडे यांच्याबाबत दावा लांडे यांनी ठरविला खोटा

लोकमान्य टाइम्स : पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड मध्ये अजितदादा पवार गटाचे तत्कालीन शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी यांच्यासह एकूण ३९ पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे अजितदादा गटाला हा मोठा धक्का मानला जात होता; परंतु या पक्ष प्रवेश हा विलास लांडे यांच्या भोवती फिरत असल्याचे पहावयास मिळाले. याबाबत विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हा प्रवेश केला असल्याचा दावा अजित गव्हाणे यांनी बुधवारी केला असताना गुरुवारी (दि.१८) अजितदादा यांनी बोलाविलेल्या बैठकीला लांडे यांनी उपस्थिती दर्शविल्यामुळे शरद पवार गटातील प्रवेशाबाबत सद्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे शहराचे राजकारण हे विलास लांडे यांच्याच भोवती फिरत असल्याने बैठक अजितदादा पवारांची ; चर्चा मात्र विलास लांडे यांची अशी चर्चा पिंपरी चिंचवडच्या राजकारणात चर्चिली जात आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे यश मिळविले. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ही त्यांची जादू चालणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात आहे. त्याअनुषंगाने त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि उबाठा गटाला बरोबर घेत तयारी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने शरदचंद्र पवार गटात घरवापासी जोरदार सुरू झाली आहे. त्यात भोसरी विधानसभा मतदार संघात भाजप चे आमदार आहेत. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी मिळणार हे नक्की आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केलेल्या अजित गव्हाणे यांनी येथे आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला.

त्यांच्या बरोबर भोसरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांशी पदाधिकारी गव्हाणे यांच्यावर विश्वास व्यक्त करीत शरद पवार गटात प्रवेश केला. परंतु या प्रवेशा अगोदर विलास लांडे हे ही प्रवेश करणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती ; मात्र प्रत्यक्षात त्यांनी बुधवारी शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या अजित गव्हाणे आणि पदाधिकारी यांच्याबरोबर न जाता तटस्थ भूमिका घेतली. त्याबाबत गव्हाणे यांना विचारणा केली असता ते आमच्याबरोबर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही आजपर्यंत वाटचाल केली आहे त्यामुळे ते आमच्याबरोबरच आसणार आहेत असा विश्वास व्यक्त केला होता.

पिंपरी चिंचवड मधील आपल्या गटाची होणारी पडझड रोखण्यासाठी आणि नवीन शहराध्यक्ष निवडण्याच्या अनुषंगाने गुरुवारी अजितदादा पवार यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीसाठी विलास लांडे उपस्थित राहणार का नाही याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. गुरुवारी अजितदादा गटाचे आमदार अण्णा बनसोडे आणि माजी आमदार विलास लांडे यांनी एकत्रित प्रवास करीत बैठकीस उपस्थिती लावली. दरम्यान याबाबत बुधवारी विलास लांडे आणि अजित पवार यांच्यात दूरध्वनीवरून संवाद ही झाल्याचे समजते.

या बैठकीस विलास लांडे उपस्थित राहिल्यानंतर माध्यमात त्याचीच जोरात चर्चा रंगली. पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणातून २०१४ आणि २०१९ च्या पराभवानंतर काहीसे बाजूला पडलेल्या लांडे यांच्याच भोवती शहराचे राजकारण फिरत असल्याचे सद्या पाहावयास मिळत आहे. त्यांना मानणारा शहरात आणि पक्ष विरहित विविध कार्यक्षेत्रातील मोठा वर्ग या शहरात आहे. राज्याच्या अनेक जिल्हा, तालुक्यामध्ये त्यांना ओळखणारा आणि त्यांच्याशी घरोब्याचे संबंध जपणारा अशी ओळखा लांडे यांच्याबाबत शहराला आहे. त्यामुळे शहरातील राजकारणाचा विषय आला की त्यांच्या नावाशिवाय ते पूर्ण होत नसल्याने शहराचे राजकारण हे लांडे यांच्याच भोवती फिरत असल्याचे चित्र सद्या पाहावयास मिळत आहे.