डिलिमिटेशन बिल : उत्तर प्रदेशात सर्वाधिक ४० तर महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकासह २४ खासदार वाढणार
- महिलाना ३३ टक्के आरक्षण : डिलिमिटेशन बरोबर महिला विधेयकाला दिली मंजूरी
- महाराष्ट्रात ४८ च्या संख्येत २४ ची भर पडून खासदारांची संख्या पोहचणार ७२ वर ; त्यात महिलांना मिळणार २४ जागा
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

केंद्र सरकारच्या सुधारित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकातील (डिलिमिटेशन बिल ) प्रस्तावानुसार, सर्व राज्यांच्या लोकसभेच्या जागांमध्ये सरसकट ५० टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. हे विधेयक पारित झाल्यास लोकसभेतील खासदारांची संख्या सध्याच्या ५४३ वरून वाढून सुमारे ८१५ इतकी होईल. त्यामध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा देण्यात येणार आहेत.
राज्यघटनेतील कमाल जागांची मर्यादा ५५० वरून ८८० पर्यंत नेण्याचा प्रस्ताव या विधेयकामध्ये मांडण्यात आला आहे. त्याचवेळी महिलांना ३३ टक्के आरक्षण (महिला विधेयक आरक्षण ) देण्याचं विधेयकही मांडण्यात येणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली आहे. हे दोन्ही विधेयकं आता संसदेमध्ये मांडण्यात येणार असून ती मंजूर करुन घेण्यासाठी सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
सरकारच्या या नव्या प्रस्तावानुसार सर्व राज्यांच्या खासदारांच्या संख्येत सरसकट ५० टक्क्यांची वाढ होणार आहे. महाराष्ट्रात सध्या ४८ खासदार असून नव्या विधेयकानुसार ती संख्या ७२ पर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे राज्यात २४ नवे खासदार वाढणार आहेत. या ७२ जागांपैकी २४ जागा या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत.
या आरक्षणामुळे सद्याच्या जागा आणि कंसात वाढणाऱ्या नवीन खासदारांची संख्या देण्यात आली आहे : उत्तर प्रदेश- ८० (४०), महाराष्ट्र – ४८ (२४) , पश्चिम बंगाल – ४२ (२१), बिहार – ४० (२०), तामिळनाडू -३९ (२०), मध्य प्रदेश – २९ (१५), कर्नाटक – २८ (१४), गुजरात – २६ (१३), आंध्र प्रदेश – २५ (१३), राजस्थान – २५ (१३), ओडिशा – २१ (११), केरळ – २० (१०), तेलंगणा – १७ ( ०९), आसाम – १४ ( ०७), झारखंड – १४ (०७), पंजाब -१३ (०७), छत्तीसगड – ११( ०६), हरियाणा – १० (०५), उत्तराखंड – ०५ ( ०३).
हिमाचल प्रदेश – ०४ (०२), अरुणाचल प्रदेश – ०२ (०१), गोवा – ०२ (०१), मणिपूर – ०२ (०१), मेघालय – ०२ (०१), त्रिपुरा – ०२ (०१), मिझोराम – ०१ (०१), नागालँड – ०१ (०१), सिक्कीम – ०१ (०१). सर्व राज्यातील खासदार ५२४ व प्रस्तावित वाढ (२६८) मिळून एकूण ७९२ लोकसभा खासदार होणे अपेक्षित आहे. तसेच १९ केंद्र शासित प्रदेशात समावेश असणाऱ्या दिल्ली – ०७ (०४), जम्मू आणि काश्मीर – ०५ (०३), दमण आणि दिव – ०२ (०१), अंदमान आणि निकोबार बेट – ०१ (०१), चंदीगड – ०१ (०१), लडाख – ०१ (०१), लक्षद्विप – ०१ (०१), पुदूचोरी – ०१ (०१). एकूण केंद्रशासित जागा – १९ (१३) मिळून एकूण जागा ३२ जागा वाढणार आहेत.

