पिंपरी चिंचवड

बाळंतविडा योजनेच्या २५ कोटींच्या निविदेवर प्रश्नचिन्ह? 

  • निविदेची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करा ;  तोपर्यंत  प्रक्रिया स्थगित करण्याची आयुक्ताकडे मागणी 
  • राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरेंचा  प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर व्यक्त केला संशय  

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

महानगपालिकेच्या  बाळंतविडा योजनेअंतर्गत स्तनदा माता आणि नवजात बालिकांसाठी साहित्य पुरवठा करण्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुमारे २५ कोटी रुपयांच्या निविदेवरून वाद निर्माण झाला आहे. निविदेतील आर्थिक आकडेवारी, तांत्रिक अटी, अनुभवाचे निकष आणि अनामत रकमेबाबत  विसंगती आढळल्याने  राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी या संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

निविदेची स्वतंत्र समितीमार्फत सखोल चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत निविदा प्रक्रिया स्थगित ठेवावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बाळंतविडा योजना ही माता आणि बालिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची सामाजिक कल्याणकारी योजना आहे. या योजनेतून गरजू लाभार्थ्यांना दर्जेदार साहित्य मिळण्याबरोबरच स्थानिक महिला बचत गट आणि सूक्ष्म व लघुउद्योजकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

 मात्र, निविदेतील आर्थिक अटी, अनुभवाची पात्रता, तीन आय एस ओ  प्रमाणपत्रांची सक्ती आणि मोठ्या आर्थिक तरतुदींमुळे स्थानिक महिला बचत गटांना स्पर्धेत सहभागी होणे कठीण होण्याची शक्यता वाघेरे यांनी व्यक्त केली आहे.

निविदा जाहिरातीमध्ये नमूद केलेली १० कोटी ९४ लाख ३४ हजार रुपये आणि १३ कोटी ८५ लाख ६० हजार रुपये या दोन रक्कमामधील   फरक स्पष्ट करण्यात आलेला नाही. सुमारे २५ कोटी रुपयांच्या निविदेचा अंदाज कोणत्या आधारावर तयार करण्यात आला, संबंधित लेखाशीर्षाखाली पुरेशी आर्थिक तरतूद आहे का? आणि वस्तुनिहाय बाजारभावांचा विचार करण्यात आला आहे का? याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.