दोन दिवसांतच स्पाईन रोडचे डांबरीकरण उखडले; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
- निकृष्ट कामाची तांत्रिक चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या मारुती जाधव यांची मागणी
लोकमान्य टाइम्स : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक ११ मधील स्पाईन रोडवर करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामाचा दर्जा अवघ्या दोन दिवसांतच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आलेल्या या रस्त्यावरील डांबर हाताने उखडून निघत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मारुती जाधव यांनी केला आहे.
दोन दिवसांपूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी, महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्या उपस्थितीत या रस्त्याच्या डांबरीकरणाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, उद्घाटनानंतर अवघ्या दोन दिवसांतच डांबर उखडत असल्याचे निदर्शनास आल्याने कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
उद्घाटनाचा गाजावाजा, मात्र कामाच्या गुणवत्तेचे काय?
जनतेच्या करातून खर्च होणाऱ्या निधीतून तयार होणारे रस्ते दर्जेदार आणि टिकाऊ असणे अपेक्षित आहे. मात्र, डांबरीकरणाचे काम काही दिवसांतच खराब होत असेल, तर संबंधित कामाची गुणवत्ता तपासणी नेमकी कशी करण्यात आली, असा सवाल मारुती जाधव यांनी उपस्थित केला आहे.
या कामात वापरण्यात आलेले साहित्य, डांबरीकरणाची पद्धत आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली गुणवत्ता तपासणी यांची सखोल तांत्रिक चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
स्पाईन रोडवरील डांबरीकरणाच्या कामाची तातडीने तांत्रिक चौकशी करण्यात यावी, संबंधित ठेकेदाराच्या कामाचे गुणवत्ता परीक्षण करावे, तसेच या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका तपासावी, अशी मागणी मारुती गणपत जाधव यांनी केली आहे.
चौकशीत काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून कठोर कारवाई करावी. तसेच रस्त्याची दुरुस्ती ठेकेदाराच्या खर्चातून करून घ्यावी आणि जनतेच्या पैशांचा अपव्यय थांबवावा, अशीही त्यांची मागणी आहे.
“उद्घाटनाच्या वेळी श्रेय घेण्यासाठी पुढे येणाऱ्यांनी आता कामाच्या दर्जाची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. जनतेला उद्घाटनाचे नारळ नकोत, तर टिकाऊ रस्ते हवेत. फोटोसेशन नव्हे, तर गुणवत्तापूर्ण विकास हवा,” अशी ठाम भूमिका मारुती जाधव यांनी मांडली.
आता या प्रकरणाची महानगरपालिका प्रशासन दखल घेऊन संबंधित कामाची चौकशी करणार का आणि दोषींवर कारवाई होणार का, याकडे प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

