पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

भाजपचे स्वार्थी राजकारण ; गरज तिथे महायुती

  • जिथे ताकद तिथे स्वबळाचा नारा

लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने स्वार्थी राजकारण खेळले आहे. मुंबई मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेत निवडणुकीला सामोरे जाण्याचे निश्चित केले आहे. तर ज्याठिकाणी ताकद आहे तेथे मात्र स्वबळाचा नारा देते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाऱ्यावर सोडण्याची दुटप्पी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. तर ठाण्याबाबतचा चेंडू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात टोलवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुती एकत्रित लढणार की स्वतंत्र यावर अनेक दिवस खल सुरु होता. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. मुंबई महापालिकेत महायुती एकत्रित निवडणूक लढविणार आणि इतरत्र महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्र निवडणुका लढविणार असल्याचे मुंबई येथे दिवाळीनिमित्त पत्रकारांसाठी आयोजित कार्यक्रमात त्यांनी जाहीर केले आहे. मुंबई महापालिका ही एक दोन वेळा वगळता दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या निधननानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ताब्यात राहिली आहे. ७ मार्च २०२२ ला मुदत संपल्यानंतर प्रशासकीय राजवट सुरु होती. आता मुंबई सह राज्यातील २९ महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंच्यायत, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात महायुती, महाविकास आघाडी आणि दोन्हीचे पक्षाचे मित्रपक्ष यांच्यात निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित लढणार की स्वतंत्र याकडे सर्वच राजकीय पक्षाच्या नजरा खिळल्या होत्या. त्याअनुषंगाने दिवाळीनिमित्त आयोजित पत्रकारांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुती बाबतची भूमिका स्पष्ट केली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ती आपल्या हातात असावी यासाठी सर्वच पक्षांबरोबरच केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपचे मुख लक्ष आहे. काही झाले तरी यावेळी मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघडीने विशेष करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनाला बरोबर घेऊन मुंबई महापालिका पुन्हा ताब्यात घेण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र या नव्या जुळवाजूळवीला मविआतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवित मनसेला दूर केले नाही तर एकला चलो रेचा नारा काँग्रेचे मुंबईतील ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी दिला असून त्याला पक्षातीलच रसद असल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळत आहे.

यावेळी काही झाले तरी मुंबई महापालिकेवर कमळ फुलविण्यासाठी भाजपने रणनीती तयार केली असून ‘अब की बार सौ पार’ चा नारा देत मुंबई महापालिका निवडणुकीपुरते भाजपने शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला बरोबर घेण्याचे निश्चित केल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले आहे. तर ठाणे महापालिकेत महायुती करायची की नाही? याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा केली जाईल, असे म्हणतं ठाण्याच्या युतीचा निर्णय शिंदेच्या कोर्टात टोलविला आहे.

त्याचबरोबर नवीन मुंबई, पुणे, पिंपरी -चिंचवड, नाशिक सह इतर महापालिकेमध्ये महायुतीतील घटक पक्ष निवडणुका स्वतंत्र लढतील आणि निवडणुका झाल्यानंतर सत्तेसाठी एकत्रित येतील असे पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले. यावरून जिथे भाजपला गरज आहे तेथे मित्र पक्षांना बरोबर घेण्याची आणि जिथे भाजप स्वबळावर सत्तेत येण्याची शक्यता आहे त्याठिकाणी मित्र पक्षाला दूर लोटण्याची नीती भाजपने आखल्याची चर्चा आहे.