राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मैदान मे ; शिंदे आणि पवार गटाला करावी लागणार तडजोड ?
- भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी आर एस एस मैदानात?
- आर एस एस चे कार्यकर्ते पोहचणार घरोघरी
- शिंदे आणि पवार गटात मात्र खलबली
लोकमान्य टाइम्स : संजय शिंदे
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक मैदानात उतरणार असल्याने भारतीय जनता पक्षात आनंदाचे वातावरण आहे. केंद्रात आणि राज्यात ज्या योजना राबविल्या त्याचा घरोघरी जाऊन शिस्तबध्द प्रचार ते करणार असल्याने त्याचा फायदा हा महायुती आणि त्याअनुषंगाने सर्वाधिक भाजप पक्षालाच होणार असल्याचे बोलले जात आहे.
हे जरी खरे असले तरी मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा यासाठी त्यांचा आग्रह राहू शकतो असे खासगीत बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला जे अपयश आले ते महायुतीतील घटक पक्षामुळेच हे ठासून सांगण्यात ही आरएसएस आघाडीवर आहे ; त्यामुळे ऐन निवडणुकीमध्ये आरएसएस भाजप पक्षासाठी मैदानात उतरणार असल्याचे समजते. त्यामुळे महायुतीत घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ला तडजोड करावी लागणार आहेच आणि भविष्यात पद वाटपात ? ही आखडता हात घ्यावा लागणार अशी चर्चा आता खुद्द भाजप अंतर्गत सुरू झाली आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुती म्हणून एकत्रित लढविल्या. त्यामध्ये एकूण ४८ जागांपैकी भाजप ०९, शिवसेना ०७, राष्ट्रवादी काँग्रेस ०१ असे एकूण १७ जागेवरच समाधान मानावे लागले. तर महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस १३, शिवसेना उध्दव ठाकरे ०९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ०८ आणि ०१ बंडखोर (काँग्रेस) अशा एकूण ३१ जागेवर मोठा विजय मिळविला ; परंतु या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जास्त सहभागी न झाल्याने (भाजपाने त्याबाबत आग्रह न केल्यामुळे) भाजपला मोठा फटका सहन करावा लागला होता.
त्यात महाराष्ट्रात सत्तेत येण्यासाठी एकसंघ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडून शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बरोबर घेत भाजपने महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता प्रस्थापित केली आहे. हे फोडाफोडीचे राजकारण मतदारांना पचले नव्हते आणि खुद्द पंतप्रधान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले होते तो भ्रष्टाचार केला असा आरोप असणाऱ्या नेत्यांनाच पुन्हा भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून सत्तेत सहभागी करून घेतल्याने मतदारांना भाजप चे हे राजकारण पटले नाही ? असा सरळ आरोप आरएसएस ने केल्याची जोरदार चर्चा त्यावेळी रंगली होती.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना बसलेल्या फटक्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये बसू नये यासाठी आरएसएस महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे. हरियाणामध्ये जो भाजपला विजय मिळाला त्याचे श्रेय हे आरएसएसला आहे . हरियाणाच्या पुनरावृत्ती करण्यासाठी महाराष्ट्रात आरएसएस प्रत्येक मतदारसंघात पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ते प्रत्येक मतदारसंघात घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार करणार असल्याने भाजपच्या गोटात उत्साह संचारला आहे.