मनोरंजन

आता वेळ झाली – कायद्यापायी अडखळलेल्या जिवांची तार्किक गोष्ट

जन्म आणि मृत्यू दोन्ही आपल्या हातात नसतं ही नकळत्या वयापासून आपल्या मनावर बिंबवलेली गोष्ट.

जन्म आणि मृत्यू दोन्ही आपल्या हातात नसतं ही नकळत्या वयापासून आपल्या मनावर बिंबवलेली गोष्ट. कोणत्याही कारणाने जगण्याची इच्छा उरली नाही म्हणून मरण कवटाळायचा अधिकार आपल्याला कायदा देत नाही. आणि आत्महत्या म्हणजे शास्त्रात म्हटल्याप्रमाणे गुन्हाच ठरतो. म्हणून ज्या सन्मानाने मी आयुष्य जगलो, त्याच सन्मानाने मला मृत्यूची वाट निवडू द्या.. असं म्हणत कायद्यापासून ते राष्ट्रपतींपर्यंत सगळी दारे ठोठावणाऱ्या नारायण आणि इरावती लवाटे या दाम्पत्याने देश हलवून सोडला होता. जगायचं नाही आहे म्हणून नव्हे तर पुरेपूर जगून झालं आहे, आता निघायची वेळ झाली आहे म्हणत त्यासाठी लढणाऱ्यांचा त्यामागचा विचार आणि त्या अनुषंगाने खरोखरच मृत्यूचं अधिकारस्वातंत्र्य देण्याची गरज आहे का? या विषयाची तार्किक मांडणी ‘आता वेळ झाली’ या चित्रपटात पाहायला मिळते.

इच्छामरण या विषयाचे अनेक पैलू कायद्याच्या चौकटीतूनही तपासले गेले आहेत. २०१८ मध्ये आपल्याकडे काही अटी-शर्तीवर अंथरुणाला खिळलेल्या व मरणासन्न व्यक्तीला इच्छामरणाचा अधिकार कायद्याने दिला गेला. मात्र निरोगी प्रकृती असलेल्या आणि तरीही आयुष्य जगण्याची इच्छा नसलेल्या व्यक्तींना अजूनही इच्छामरण स्वीकारण्याचा अधिकार नाही. त्या पार्श्वभूमीवर नारायण आणि इरावती लवाटे या वृद्ध दाम्पत्याने सन्मानाने मृत्यू मिळावा यासाठी दिलेल्या लढय़ाची गोष्ट मुळातून समजून घ्यावी अशी आहे. दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी अत्यंत संवेदनशीलतेने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने या दोघांचे त्यामागचे विचार समजून घेत ‘आता वेळ झाली’ या चित्रपटातून इच्छामरण विषयाचे विविध पैलू उलगडले आहेत. इथे शशीधर लेले आणि रंजना लेले या काल्पनिक जोडप्याच्या माध्यमातून ही कथा रंगवली गेली आहे.